दिलखुलास संवादातून उलगडला जीवन विषयक दृष्टीकोन
पुणे, ता. : “भारत माता की जय बोलणे हे आपलें केवळ कर्तव्यच नव्हे तर अधिकार ही आहे. त्यामुळे मी भारत माता की जय म्हणणारच,” अशा कडक शब्दात पद्मश्री जावेद अख्तर यांनी ठणकावताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि भारत माता की जय असा जयघोष घुमला.
गोयल गंगा ग्रुपने उत्कृष्ठ कामगिरी बजावणा-या सहका-यांना गौरविण्यासाठी उंड्री येथील ग्लीटझ प्रकल्पात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गोयल गंगा ग्रुपचे अध्यक्ष जयप्रकाश गोयल, व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल, संचालक अमित गोयल यावेळी उपस्थित होते. लीना जोशी यांनी साधलेल्या संवादातून अख्तर यांनी आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यक्त केला.
गळ्याला सुरी लावेली तरी भारत माता की जय म्हणणार नाही असे म्हणणा-या ओवेसींना राज्यसभेतील भाषणात त्याचे नाव न घेतां अख्तर यांनी खडे बोल सुनावले होते.त्यानंतर प्रथमच पुण्यात आलेल्या अख्तर यांच्या भाषणाबद्दल उपस्थितांमध्ये उत्सुकता होती. राज्यसभेतील या गाजलेल्या भाषणाची क्लीप दाखवून अख्तर यांच्याशी संवादाची सुरुवात करण्यात आली.
शेरवानी व टोपी घालावी असे कुठे संविधानात म्हटले आहे? असे मिश्किलपणे बोलत, संविधानात हे लिहले नाही असा प्रतिवाद करणा-या ओवेसीची नाव न घेतां अख्तर यांनी फिरकी घेतली. त्यावर श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत अख्तर यांना अभिवादन केले.
समाजाची स्वतःची अशी अंतर्गत संवाद पध्दती असून ती ज्याला समजेल तो नक्कीच यशस्वी होतो असे मत ख्यातनाम साहित्यिक, पद्मश्री जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.
अख्तर म्हणाले की, फायदा प्रत्येकालाच हवाय पण जीवनात गुडवील (पत) सुध्दा तितकीच महत्वाची आहे. गुडवील कसे येते व कसे जाते हे समजण्यासाठी समाजाची भाषा समजली पाहिजे. समाजातील ही संवाद पध्दती अशी आहे की ती आपल्याला फारशी माहिती नाही. मतदार सांगत नाही की आपण कोणाला मत देणार आहोत. एखादा चित्रपट हीट ठरतो तर एखादा फ्लॉप. समाज मनाची ही लाट कशी तयार होते, हा संवाद कसा चालतो हे ज्याला समजते तो यशस्वी होतो.
अख्तर म्हणाले की, आपण भाषेपासून दूर गेलो तर आपल्या भूमीपासून दूर जातो. आपल्याकडे इंग्रजीचा आग्रह धरला जातो. इंग्रजी आलीच पाहिजे. ती आता जगाची भाषा बनली आहे. पण मातृभाषेतूनही शिक्षण मिळालेच पाहिजे. आपली भाषा गरीबाच्या घरात वाढते. पण तीच्यावर संस्कार करायला, सजवायला गरीबाला वेळच नसतो. मध्यमवर्गाकडून भाषेवर संस्कार केले जातात. परंतु आता मध्यमवर्ग इंग्रजीच्या मागे लागला आहे.
तुम्ही एखाद्याला दिलेले अन्न, पैसा, घर, नोकरी या सर्व गोष्टी ते विसरुन जातील पण तुम्ही केलेला अपमान ते कधीच विसरत नाहीत. म्हणून तुम्ही लोकांशी नम्रतेने भेटत रहा. ते तुम्हाला कधी विसरणार नाही. लोकांना रिस्पेक्ट द्या. जर प्रत्येकजण माझ्यावर अन्याय होतो म्हणत असेल तर अन्याय करणारा कोण आहे? कुछ मै भी हूँ, कुछ हालात भी है असे सांगत अख्तर म्हणाले की हा दुहेरी मार्ग आहे. सगळे दुस-यावर, परिस्थितीवर ढकलने योग्य नाही. परिस्थितीच अशी होती अशी तक्रार आपण करत असतो. पण परिस्थिती ही प्रतिक्रिया आहे. जसे आपल्यावर परिस्थितीवर परिणाम करत असते तसेच आपणही परिस्थितीवर परिणाम करत असतो. परिस्थिती आपणही घडवत असतो. गौतम बुध्द, महात्मा गांधी यांना पण दुश्मन होते, त्यांनाही अडचणी आल्या, त्रास झाला तर आपण काय चीज आहे.
आज भी मै फेके हुए पैसे नही उठाता, शेर खान आज का काम कल पर नही छोडता, दुनिया में हर चीज बिझनेस नही होती, जो डर गया समझो मर गया या सारख्या गाजलेल्या संवादावर भाष्य करत अख्तर यांनी आपला जीवन विषयक दृष्टीकोन उलगडला. ए खेल क्या है, ए वक्त क्या है या कविताही अख्तर यांनी ऐकवल्या.
रजत सचदेव, उर्वी आँचल, परिक्षित साळुंखे यांना अख्तर यांच्या हस्ते गेट रियल अवार्ड प्रदान करण्यात आला.
नितीन कुलचंद्र, सज्जाद शेख, रोहीत सावंत, अनंत मीश्रा, मयूर जाधव, विनोद उपाध्ये, कुणाल भान, विक्रम भारव्दाज, शिवेंद्र प्रतापसिंह, विक्रम देशमुख, नितीन सातारकर आदींनाही उत्तम कामगिरीबद्दल स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.

