पुणे- जय जय राम कृष्ण हरी चा नामघोषात सुरू झालेल्या ‘सूर संगम’ मैफीलीला पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. निमित्त होते गोयल गंगा ग्रुप आयोजित ‘सुखकर्ता २०१६’ या कार्यक्रमाचे. सुप्रसिद्ध गायक राहूल देशपांडे आणि शौनक अभिषेकी यांनी आपल्या गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी गोयल गंगा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल, सीईओ किरण कुमार देवी उपस्थित होते.
अभंग रंग आणि नाट्य रंग सादर करण्यात आलेल्या या मैफीलीमध्ये दोन घराण्यांचा गायकीचा अनोखा मिलाफही यावेळी रसिकांनी अनुभवला. सावळे सुंदर रूप मनोहर, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, मर्मबंधातली ठेव ही, मोरया मोरया या रचना यावेळी सादर करण्यात आल्या. सूर निरागस हो या गाण्याला प्रेक्षकांनी ‘वन्स मोअर’ म्हणत भरभरून दाद दिली. तर राहूल देशपांडे आणि शौनक अभिषेकी यांची नाट्य संगीत आणि सिने संगीताच्या जुगलबंदीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच गणेश वंदनेने कार्यक्रमात रंगत आणली.
सुखकर्ता कार्यक्रमाच्या निमित्त्याने गोयल गंगा परिवाराचे सर्व सदस्य एकत्र येऊन हा आनंदोत्सव साजरा करतात. असाच आनंदोत्सव दरवर्षी साजरा करता यावा आणि पुढील वर्षभर सर्वांना जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळावी, अशी प्रार्थना अतुल गोयल यांनी यावेळी श्रींच्या चरणी केली.
सुखकर्ता कार्यक्रमामध्ये घेण्यात आलेल्या विविध कलागुणदर्शन स्पर्धेमधील विजेत्यांना राहूल देशपांडे आणि शौनक अभिषेकी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

