पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गोयल गंगा फाऊंडेशने बांधकाम क्षेत्रातील मजूर महिलांना आधार कार्डची नोंदणी करण्याचा विधायक उपक्रम राबविला. गोयल गंगा डेव्हलपर्सच्या बावधन, उंड्री, मार्केटयार्ड, कोंढवा आदी गृहप्रकल्प असणाऱ्या ठिकाणी आज या महिलांची अर्ज भरून नोंदणी करण्यात आली. हा उपक्रम २७ तारखेपर्यंत सुरु राहणार केवळ मजूर महिला नव्हे तर इतरांनाही याचा लाभ घेता येणार आहे.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल गोयल म्हणाले की, बांधकाम मजुरांचे सातत्याने होणारे स्थलांतर, साक्षरतेचा अभाव आणि बोली भाषेची अडचण यांसारख्या समस्यांमुळे सरकारी योजनेचा त्यांना लाभ घेता येत नाही. हे लक्षात घेऊन आम्ही मजुरांची आधार कार्ड नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमास सर्व आमच्या सर्व प्रकल्पांच्या स्थळी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आधार कार्ड हा ओळखपत्राचा दस्तावेज आहे. सरकारच्या विविध सेवा, लाभ आणि सबसिडी यांची पुरवठा प्रक्रिया सोपी आणि सुलभ व्हावी तसेच हे लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावे यासाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नुकतंच ३० पेक्षा अधिक सरकारी सुविधांसाठी आधार अनिवार्य केलं आहे. जवळपास ८४ प्रकारच्या सरकारी सुविधांसाठी सध्या आधार अनिवार्य आहे. या सर्व सुविधांचा लाभ या एका कार्डमुळे त्यांना घेता येईल. यातील काही लोकांना हे महत्वाचे ओळखपत्र नसल्यामुळे यावर्षी मतदानापासून वंचित राहावे लागले. यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले.