गोयल गंगा फाउंडेशनतर्फे झालेल्या सत्रात आचार्य यांचा पालकांना सल्ला
पुणे ता. २:- “आनंदी पालक आनंदी पिढी घडवू शकतो. पाल्यावर संस्कार करण्यासाठी पालक आणि पाल्य यांच्यात सुसंवाद असायला हवा.
स्वतः तणावमुक्त असलेले पालकच आपल्या मुलांना आनंदी जीवन जगायला शिकवू शकतात हे पाहता पाल्यांच्या सुखासाठी आपण तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब करावा,”असा सल्ला आचार्य वागेशजी यांनी पालकांना दिला.
गोयल गंगा फाउंडेशनतर्फे आय-पेरेंट्स या चर्चासत्रात विविध विषयातील तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली.यावेळी आचार्य यांनी ‘आदर्श पालकत्व’ या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले. आपल्या पाल्याशी सुसंवाद साधा.त्यांना सुचणार्या नवीन कल्पना, विचार आणि स्वतःच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा, आपल्या मुलांना वेळ द्या.
मुलांशी बोलतांना सतत सकारात्मक बोलायला हवे. आपल्या बोलण्यातून मुलांना प्रोत्साहन मिळायला हवे, असेही आचार्य यावेळी म्हणाले.
‘आय पेरेट्न्स’ या सत्रांत ‘निरोगी आई तर निरोगी कुटुंब’ याविषयावर आहार तज्ञ नेहा मित्तल यांनी संवाद साधला. संतुलित आहाराकडे होणारे दुर्लक्ष आणि नंतर सुदृढ आरोग्य प्राप्त करण्यासाठी नाहक खर्चिला जाणारा वेळ आणि पैसा ही सध्याची जीवशैली झाले आहे. परंतु आरोग्य गमविले तर ते परत मिळविणे फारच कठीण आहे त्यामुळे आपले करीयर सांभाळताना संतुलित आहाराकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत मित्तल यांनी व्यक्त केले. तर स्त्री ही वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतानाच आता फॅमिली डॉक्टर असण्याचीही जबाबदारीही पेलते आहे. त्यासाठी सर्वप्रथम ती सक्षम आणि आरोग्यदृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे, असे मत फिटनेस ट्रेनर पी. व्ही. के. रमन यांनी व्यक्त केले होते.
‘आय पेरेट्न्स’ हे चर्चासत्र आम्हाला अत्यंत उपयोगी ठरले अशा शब्दांत पालकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.