मुंबई, दि. २९ डिसेंबर – केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्या विरोधात सूडबुध्दीने कारवाई करुन त्यांना जेरीस आणण्याचा महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत पोलिसांचा नियोजनबद्ध कार्यक्रम दिसत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, विधानभवनाच्या पाय-यांवर जो प्रकार झाला तो निंदनीय आहे. ज्याचा देवेंद्र फडणवीसजींनी सुध्दा याबाबत सभागृहात आपली भूमिका मांडली. पण तोच राग मनात ठेवून सरकारच्या दबावामुळे पोलिस नितेश राणे यांच्याविरुध्द कारवाई करीत आहेत. ज्या दिवशी उपमुख्यमंत्री , राज्यमंत्री आणि पालक मंत्री कणकवलीत होते, त्याच दिवशी माझ्या माहितीप्रमाणे काही करून या ठिकाणी नितेश राणे यांना ताब्यात घ्यावी अशा प्रकारची सूचना दिल्याची सूत्रांची माहिती असल्याचेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.
तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुध्दा नोटीस पाठवायची व त्यांच्याविरुध्द दबाव निर्माण करायचा असा सरकार पुरस्कृत पोलिसांचा कार्यक्रम असल्याची टीका करताना दरेकर म्हणाले की, झालेल्या हल्ल्याचे समर्थन आम्ही करत नाही, जे आरोपी असतील त्यांना पकडा व दोषींवर कारवाई करा. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत असून ती बॅंक सतिश सावंत यांच्या ताब्यातून ती राणे यांच्याकडे पर्यायाने भाजपाकडे जाईल अशी आघाडी सरकारला भीती आहे.
त्यामुळे सगळ्या सरकारी यंत्रणांचा दबाव आणत पोलिसांचा वापर करणे जेणेकरुन राणे यांना एका ठिकाणी अडकवून ठेवावे व त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर केल्यास आपल्याला निवडणुकीच्या दृष्टीने मोकळे रान मिळेल आणि असणारी सत्ता अबाधित ठेवता येईल अशा प्रकारचा सरकार पुरस्कृत कार्यक्रम असल्याचा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुध्द सुडबुध्दीने कारवाईचा सरकारचा डाव- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
Date: