मुंबई-“सरकार बदलल्यानंतर ज्या अनेक गोष्टी अपेक्षित असतात, त्यातीलत ही एक गोष्ट आहे. याचा अर्थ तो विषय संपलेला नाही. आयएनएससाठी पैसे गोळा झाल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. मग तो एक रुपया असेल किंवा ५० कोटी असतील. पैशांचा अपहार झालाच आहे. पैसे राजभवनात गेले असं म्हणतात आणि राजभवन म्हणतं पैसे आलेच नाहीत. हाच तर भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा पुरावा आहे,” असं खासदार संजय राऊतांनी म्हटले आहे.
आयएनएस ‘विक्रांत’ निधी अपहार प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना क्लीन चिट मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या पितापुत्रांना क्लीन चिट देत दिलासा दिला आहे. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याची कबुली मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली आहे. दरम्यान सोमय्यांनी क्लीन चिट देण्यात आल्यानंतर संजय राऊतांनी २०२४ मध्ये हिशोब केला जाईल असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.
“राज्याच्या गृहमंत्र्यांना हा प्रश्न विचारायला हवा. आमच्या लोकांना क्लीन चिट मिळणार नाही. हा खरं तर ईडीच्या अख्त्यारितला विषय आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी झालेला हा खेळखंडोबा आहे. पण आज जरी क्लीन चिट मिळाली असली तरी २०२४ ला हे प्रकरण समोर येणार नाही असं नाही. कोणतंही सरकार हे कायमस्वरुपी नसतं. सरकार बदलेल आणि सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल,” असा इशारा संजय राऊतांनी दिली आहे. मी याप्रकरणी केंद्राला पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

