- विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली मुंबई विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या दुरवस्थेची पाहणी.
मुंबई, दि. २४ फेब्रुवारी – मुंबई विद्यापीठाचे वैभव असणारे मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू हे ग्रंथालय अखेरची घटका मोजतेय. तात्काळ या ग्रंथालयाचे पुनर्जीवन करून, पुस्तकांची चांगल्या प्रकारे व्यवस्था व्हावी, चांगल्या प्रकारचे रिनोवेशन व्हावे. पीएचडी, रिसर्च करण्यासाठी जे विद्यार्थी येतात त्यांना चांगले वाटेल असे दर्जेदार वाचनालय उभे करावे, अशी विनंती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची पाहणी केली. या ग्रंथालयाची दुरवस्था आणि पुस्तकांना लागलेली वाळवी पाहून त्यांनी खेद व्यक्त केला. दरेकर म्हणाले की, या ग्रंथालयाची देखरेख करण्यासाठी कर्मचारीवर्गाचीदेखील वानवा असल्याचे दिसून आले. तेथे पुरेशी यंत्रासामग्री नाही. तेथील पुस्तकांचे व्यवस्थित नियोजन करण्याची आवश्यकता आहे. तेथे शेजारीच २५ कोटी रुपये खर्च करून बांधलेली इमारत उभी आहे. परंतु दोन-तीन वर्षे होऊनही अद्याप तेथे डिजिटल लायब्ररी सुरू झालेली नाही. असे दरेकर यांनी सांगितले. सरकारने तात्काळ या ग्रंथालयाचे पुनर्जीवन करत पुन्हा दर्जेदार ग्रंथालय उभारावे अन्यथा आगामी अधिवेशनात याविषयी पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

