मुंबई-आवाजी मतदानाने निवडणूक घटनाबाह्य असल्याची भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा असताना हे वृत्त आल्याने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. आता यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान आज संध्याकाळपर्यंत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेविषयी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून उत्तर दिलेले आहे. राज्यपाल म्हणाले आहेत की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलची प्रक्रिया घटनाबाह्य आहे. म्हणजेच आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र पाठवत शिफारस केली होती. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत दोन पत्रे पाठवली. मात्र राज्यपालांनी वेगवेगळी कारणे दिली आहेत. यानंतर आता मुख्यमंत्री तिसऱ्यांदा राज्यपालांना पत्र पाठवणार आहेत.राज्य सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल केला होता. यापूर्वी गुप्त मतदानाने ही निवडणूक घेतली जात होती. मात्र, सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदललेला होता. आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याने तो घटनाबाह्य आहे असे राज्यपाल म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी घेतली होती राज्यपालांची भेट
महाविकास आघाडी सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. यानुसार सोमवारी या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार होता. तर मंगळवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही निवडणूक पार पडणार अशी शक्यता होती. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून निवडणूक कार्यक्रमाला मंजूरी देण्यात आलेली नाही. यासाठी महाविकासआघाडीतील नेते रविवारी राज्यपालांना भेटले होते. मात्र, राज्यपालांनी मी कायेदशीर अभ्यास करुन निर्णय देईल असे उत्तर दिले होते. यानंतर आज त्यांनी पत्र पाठवत राज्य सरकारला उत्तर दिले आहे. यामध्ये त्यांनी आवाजी मतदानास विरोध केला आहे.

