पुणे – शहरात शासकीय व्यसनमुक्ती केंद्र उभारण्याची गरज असून येरवड्यातील मनोरुग्ण विभागाच्या आवारात ते सुरू करावे असा प्रस्ताव आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) विधानसभेत मांडला.
पुण्यात व्यसनमुक्ती केंद्र बरीच आहेत. परंतु, तेथील दर सामान्य लोकांना परवडणारे नाहीत. व्यसनाधीन व्यक्तीचे स्वतःचे तर नुकसान होतेच पण, त्यांची कुटुंबेही उध्वस्त होताना दिसतात. याकरिता शासकीय व्यसनमुक्ती केंद्राची गरज आहे. येरवडा येथील मनोरुग्ण रुग्णालयाच्या आवारात २०० रुग्णांसाठी व्यसनमुक्ती केंद्र सुरु करता येईल एवढी जागा आणि सुविधा आहे. मानसिक वैद्यकीय उपचारांचीही तेथे व्यवस्था आहे. पुण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधिक्षक यांनी यासंबंधीचा प्रस्तावही राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा, मुंबई यांना पाठविला आहे. तरी, व्यसनमुक्ती केंद्र सुरु करावे आणि त्याकरिता १कोटी,२१ लाख रुपयांची तरतूद करावी असा प्रस्ताव आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत मांडला.
यासंबंधी उप मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी यापूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे असे सांगून लवकरात लवकर केंद्र सुरु व्हावे अशी विनंती केली आहे.

