पुणे – येरवडा येथील गोल्फ क्लब चौक उड्डाणपुलाचे काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती शहर भाजपचे अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आज दिली.
जगदीश मुळीक यांनी आज या प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवक योगेश मुळीक, बापूराव कर्णे, राहुल भंडारे, महापालिकेचे मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, कार्यकारी अभियंता अभिजित आंबेकर, अभियंता राकेश शिंदे, प्रकल्प प्रमुख राजेश शिंदे, भाजपचे पदाधिकारी संतोष राजगुरू, अर्जुन जगताप, महेश गलांडे, संतोष घोलप, विकास घोडके, अमोल तारू, पुनजी जगताप यावेळी उपस्थित होते.
मुळीक पुढे म्हणाले, ‘उड्डाणपुलाच्या दहा पीलरपैकी ७ पीलरचे काम पूर्ण झाले आहे. तीन पीअर कॅप आणि दोन स्लॅबची कामे पूर्ण झाली आहेत. गोल्फ क्लब चौक ते विमानतळ या भागातील रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यानंतर उर्वरीत तीन पीलरचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असणारा २८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी पुणे महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रकल्पाचे काम वेगाने आणि निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून मार्च 2022 पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे.’
मुळीक पुढे म्हणाले, ‘गुंजन टॉकिज ते विमानतळ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शास्त्रीनगर चौक हे रस्ते एकमेकाला क्रॉस होतात. आंबेडकर चौक ते शास्त्रीनगर चौक या रस्त्यावर पिंपरी-चिंचवड, भोसरी, आळंदी, खडकी तसेच मुंबईकडून नगर रस्त्याकडे येणारी वाहतूक आहे. त्यात मोठ्या प्रमाणात जड वाहतुकीचा समावेश आहे. तसेच गुंजन चौक ते विमानतळ या रस्त्यावर पुणे शहरातून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सदर चौकात केलेल्या वाहनांच्या सर्वेक्षणानुसार प्रति दिन सुमारे १ लाख ७० हजार इतकी वाहने या चौकातून जातात. त्यामुळे सदर चौकात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असून त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी दोन वर्षांपूर्वी नगरसेवक योगेश मुळीक स्थायी समितीचे अध्यक्ष असताना उड्डाणपुलाचे काम प्रस्तावित केले आणि आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे या भागातील वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी मदत होणार आहे. २८० मीटर लांबी आणि १५.६ मीटर रुंदीच्या उड्डाणपुलाचे काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण होईल.’

