मुंबई : अमेरिकन राष्ट्रध्यक्षपदाची मत मोजणी निर्णायक टप्प्यावर आली असून त्याचे पडसाद कमॉडिटी बाजारावर उमटत आहेत. सोने आणि चांदीने आज गुरुवारी सकाळी जोरदार उसळी घेतली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१२५८ रुपये आहे. त्यात ४३८ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत देखील ६७४ रुपयांची वाढ झाली असून एक किलोचा भाव ६२०६३ रुपये झाला आहे.goodreturns.in या वेबसाईटनुसार गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९९०० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५०९१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९६६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५४१६० रुपये आहे. कोलकात्यात ग्राहकांना २२ कॅरेट सोने खरेदीसाठी ४९७६० रुपये मोजावे लागत आहेत. तर २४ कॅरेटचा भाव ५२९६० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅमसाठी ४७९०० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२२६० रुपये आहे. सोमवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती. तर मंगळवारी आणि बुधवारी घसरण झाली होती. बुधवारी बाजार बंद होताना सोने ५०८१० रुपयांवर बंद झाले होते. त्यात ७८८ रुपयांची घसरण झाली. चांदीचा भाव १३६५ रुपयांनी कमी झाला होता.जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस भाव १९०४.६६ डॉलर आहे. चांदीच्या दरात ०.३ टक्के वाढ झाली असून चांदीचा भाव प्रती औंस २३.९८ डॉलर आहे. इतर चलनांच्या तुलनेत डॉलर इंडेक्स ०.०२ टक्क्यांनी वधारला आहे. त्याआधीच्या सत्रात डॉलर इंडेक्स ०.८ टक्क्यांनी वधारला होता.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटीतटीची लढत सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी निर्णायक आघाडी घेतली असून विजयासमीप ते पोहचले आहेत.

