पुणे : ”राजकारणात यायच्या भानगडीत पडू नका,आता मी आलोय, इथेच अडकून पडलोय ,कोणत्याही क्षेत्रात जा, पण आई वडिलांचे नाव रोशन करा, असा सल्ला उद्याच्या पिढीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला. चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा, विश्वासार्हता संपली की माणूस संपतो. मित्र निवडताना चांगले मित्र निवडा, मित्रच बरबाद करायला असतात, असं वक्तव्यही अजित पवार यांनी केलं. पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2020 मध्ये पुणे जिल्हयातील गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या 106 विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. त्यावेळी आयोजित गुणगौरव सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, सारीका पानसरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कु-हाडे उपस्थित होते.

राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलोय आणि अडकलोय. कुठं जाता येईना आणि बाहेरही पडता येईना, असंही अजित पवरांनी यावेळी हसत सांगितलं. तसेच आम्ही कधीपर्यंत खुर्चीवर, तर जनतेने सांगितलं तोपर्यंत. जनता म्हटली घरी बसा, की चाललो आम्ही. पण सीईओ बघा. जोपर्यंत रिटायर होत नाही, तोपर्यंत खुर्चीवर असतो. शिवाय प्रमोशन होत जातं. अभिनेता, कला, संगीत, पत्रकारिता अशी वेगवेगळी क्षेत्र निवडू शकता, असा मोलाचा सल्ला देखील अजित पवारांनी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.
कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नवं माध्यम स्वीकारलं पाहिजे. ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, पण कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन देखील अजित पवार यांनी यावेळी केलं. मला खूप जण भेटतात. कोरोनामुळे आमची नोकरी गेल्याचं सांगतात. त्यामुळे मुलांनो करिअर निवडताना विचार करा, आपल्या वडिलांना विचारा, असं अजित पवारांनी सांगितलं.शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून भावी काळात विद्यार्थ्यांनी भारताच्या उज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनाची सर्वात जास्त झळ विद्यार्थ्यांना सोसावी लागली आहे. सगळेच विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकले नाहीत. पण काळाप्रमाणे सर्वांनी बदलले पाहिजे असे सांगून ते म्हणाले मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात कौशल्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. अजूनही कोरोनाबाबतची खबरदारी विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतली पाहिजे. शाळेमध्ये मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझरचा वापर करावा आदी सूचना त्यांनी दिल्या.

श्री. पवार म्हणाले, करिअर निवडताना वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या, स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे या. प्रशासकीय सेवेत दाखल झाल्याने निर्णय घेता येतात, अंमलबजावणी करता येते असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. काही मुलांनी आवडीनुसार शेतीही करावी. शेतीतही चांगले करिअर करता येते परंतु धाडस करणे गरजेचे आहे. ज्या क्षेत्रात उतराल त्यात आपल्या आई-वडिलांचे नाव करा, असे सांगून कष्ट करत रहा, नावीन्याचा ध्यास घ्या, नैतिकतेचा विसर पडू देऊ नका, प्रामाणिकपणे वागा, कुणाची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्या, चांगले मित्र-मैत्रिणी निवडा, व्यायाम करा, आरोग्य सांभाळा, कितीही यश मिळाले तरी आई-वडिलांना विसरु नका, असा सल्ला श्री. पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली आहेत, त्याला विद्यार्थ्यांनी साथ द्या असे सांगून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक त्यांनी केले.
त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी केले. प्रास्ताविकात शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली.
शिक्षणाधिकारी सुनील कु-हाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फिरत्या पशुचिकीत्सा व्हॅनचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत फिरते पशुचिकित्सा व्हॅनचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपसभापती रणजीत शिवतरे तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

