आगामी 3-4 महिन्यांत आयुष रुग्णालयाचे उद्घाटन शक्य- श्रीपाद नाईक
पणजी, 10 जून 2022
केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल आणि केंद्रीय पर्यटन तसेच बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पेडणे येथील आयुष रुग्णालय आणि मोपा विमानतळाच्या कामाला भेट देऊन पाहणी केली. केंद्र सरकारला सत्तेत 8 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध विकासकामांची माहिती घेण्यासाठी केंद्रीय मंत्र बघेल गोवा दौऱ्यावर आहेत.
एस पी सिंह बघेल यांनी आयुष रुग्णालयाची गोव्यात उभारणी होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला तसेच राज्यातील जनतेचे अभिनंदन केले. गोव्यासाठी एवढा अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त आयुष रुग्णालयाचा प्रकल्प आणण्यासाठी श्रीपाद नाईक यांचे महत्त्वाचे योगदान आहे, असे बघेल म्हणाले.

श्रीपाद नाईक यांनी 2014 मध्ये नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या आयुष मंत्रालयाचे काम करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. या आयुष रुग्णालयामुळे गोव्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असे नाईक म्हणाले. आयुष रुग्णालयाचे आगामी 3-4 महिन्यात उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

250 खाटांचे रुग्णालय आणि दरवर्षी 500 विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी शिक्षण यातून देण्यात येईल. तसेच या रुग्णालयात 100 खाटा निसर्गोपचारासाठी असतील. योग रुग्णालयात मधुमहे, ह्रदयरोग तपासणी विभाग असणार आहे. तसेच आयुर्वेद, निसर्गोपचार आणि योग रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुविधा असणार आहे. यात डॉक्टरांसाठी 67 खोल्या आणि विद्यार्थ्यांसाठी 91 खोल्यांची सोय करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचा खर्च 301 कोटी रुपये असून याच्या उद्घाटनानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

दोन्ही मंत्र्यांनी मोपा विमानतळाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी जीएमआर ग्रूपकडून तपशीलवार सादरीकरण करण्यात आले. विमानतळ संचलनासाठी 1 सप्टेंबर 2022 पासून तयार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. आग्रा-गोवा हवाईमार्गाने जोडल्यास पर्यटनाला आणखी चालना मिळेल, असे बघेल यांनी यावेळी सांगितले.

