पुणे : हर हर महादेवचा जयघोष… रुद्र मंत्रपठण… शिवभक्तीचा जागर अशा भक्तिमय वातावरणात जगभरातील एक लाखाहून अधिक शिवभक्तांनी ऑनलाईन महारुद्राभिषेक केला. भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांना अभिवादन, तसेच विश्वशांतीचा प्रसार आणि दहशतवाद मुक्तीची प्रार्थना करण्यासाठी हा रुद्राभिषेक झाला. वाराणसी येथील काशी विश्वनाथ, बारा ज्योतिर्लिंग आणि देशभरातील शिवालयात रुद्रमंत्राचा नाद दुमदुमला.
महारुद्राभिषेकाचे संयोजक व वयम संस्थेचे संस्थापक गौरव त्रिपाठी यांच्यासह जगभरातील शिवभक्तांच्या वतीने उडुपी येथील युवा उद्योजक, आत्मा फाउंडेशनच्या संचालक रश्मी सामंत यांनी काशी विश्वनाथ मंदिरात रुद्राभिषेक केला. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात विश्व हिंदू परिषदेचे संपर्क प्रमुख मनोहर ओक, लंडन येथील अलेक्स हॅन्की व शिवभक्त पवार यांनी रुद्राभिषेक केला. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन सहभागी होत जगभरातील शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी ३.३० ते ४.३० या कालावधीत महारुद्राभिषेक झाला. १४१ देशांतील हिंदूंनी यात सहभाग घेतला.
माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, श्री ओंकारेश्वर देवस्थानचे मुख्य विश्वस्त धनोत्तम लोणकर, भारतमाता महिला मंडळ ट्रस्टच्या कार्याध्यक्ष प्रियंका शेंडगे-शिंदे आदी उपस्थित होते. बालन ग्रुपचे पुनीत बालन यांच्यासह क्रिएटिव्ह कार्व्ह प्रायव्हेट लिमिटेडचे पवन सराफ, समसारा कॅपिटलचे मनीष जालान, पार्टेक्स एनव्हीचे संस्थापक गुंजन भारद्वाज, इनोप्लेक्सस कन्सलटिंग सर्व्हिसेसचे अमित आननपरा यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले.
भारत शांतता, एकात्मता आणि विकासावर भर देत असल्याचा संदेश विश्वाला देण्याचा प्रयत्न यातून केला गेला. विश्व हिंदू परिषदेचे महासचिव स्वामी विज्ञानानंद महाराज यांच्या कल्पनेतून हा महारुद्राभिषेक साकार झाला. १२९ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी दिलेल्या या शांती संदेशाचे, तसेच अमेरिकेवरील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांचे स्मरण याद्वारे करण्यात आले, असे मनोहर ओक यांनी नमूद केले.
धनोत्तम लोणकर म्हणाले, “काशी विश्वनाथ मंदिरासह हा महारुद्राभिषेक ओंकारेश्वर मंदिरातही झाला, याचा आनंद आहे. ओंकारेश्वर हे पुणेकरांचे श्रद्धास्थान असून, पुणेकरांनी यात सहभागी नोंदवला. समाजातील वाईट शक्तींना संपवण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल.”
भारतीय संस्कृती सहिष्णू असून, एकात्मता, बंधुभाव त्याचा गाभा आहे. संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखविण्याचे काम अनेकदा भारताने केले आहे अध्यात्माचे अधिष्ठान असलेल्या भारतीय संस्कृतीत रुद्राभिषेकाला अतिशय महत्व असून, विश्वाला दहशतवादमुक्त करण्यासाठी प्रार्थना केली.
– ॲलेक्स हॅन्की, लंडनहून आलेले शिवभक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या ‘डिजिटल इंडिया’मुळे भारतातील लोकांनीही मोठ्या प्रमाणावर हा महारुद्राभिषेक सोहळा पाहिला. श्री काशी विश्वनाथ मंदिर प्रशासन, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वर्मा यांनी या सोहळ्याच्या यशासाठी सहकार्य केले. सर्व सहयोगी व्यक्तींचे आभार मानतो.
– गौरव त्रिपाठी, संयोजक व संस्थापक वयम संस्था