पुणे- महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त सण ऍडव्हान्स दिला जातो. व दर महिन्याला पगारातून कपात करून वर्षभरात वसुली केली जाते. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात एकवट मानधनावर काम करणाऱ्या बालवाडी शिक्षिका व सेविका यांना सण ऍडव्हान्स २५०० रुपये देण्यात येतो त्याऐवजी कोरोनामुळे हतबल झाल्यामुळे यंदा ५००० रुपये सण ऍडव्हान्स देणेसाठी मान्यता देण्यात आली आहे. परंतु पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सांगून यास विलंब होत आहे. दिवाळीनिमित्त दरवर्षी देण्यात येणारा सण ऍडव्हान्स हे कोणत्याही प्रकारचे आमिष नसल्याने या सेवकांना सण ऍडव्हान्स देण्यास आचारसंहितेचा भंग होत नाही असे पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी म्हटले आहे.
दिवाळी सण तोंडावर असताना कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या या सेवकांची अडवणूक करण्यात येऊ नये. बालवाडी शिक्षिका व सेविका ह्या एकवट मानधनावर काम करत असून त्यांना मिळणारा मासिक मोबदला खूपच कमी आहे. त्यात सण ऍडव्हान्स मिळाला नाही तर ऐन दिवाळीत त्यांच्यावर संक्रांत येईल. आपण २५०० ऐवजी ५००० रुपये ऍडव्हान्स देण्यास मान्यता देऊन स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यास कोणत्याही आचारसंहितेचा भंग होत नसल्याने कोरोना काळात खरे काम करणाऱ्या कोरोना योध्यांच्या पाठीशी महापालिका खंबीरपणे उभी आहे. हे स्पष्ट होईल. याबाबत आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून दिवाळीपूर्वी बालवाडी शिक्षिका व सेविकांना सण ऍडव्हान्स देण्यासाठी संबंधितांना आदेश देऊन त्यांची दिवाळी सुखकर करावी असे आबा बागुल शेवटी म्हणाले

