पुणे- एकशेवीस ऑक्सिजन बेड चे कोविड सेंटर उभारून कित्येक दिवस उलटले पण सारे काही तय्यार असून ऑक्सिजन च पाठवला जात नाही म्हणून गणेश कला क्रीडा केंद्रात सुरु झालेले हे कोविड सेंटर धूळ खात पडून आहे …आता हे उभारण्यास पुढाकार घेतलेल्या माजी उपमहापौर असलेल्या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकावर ..ऑक्सिजन द्या हो .. ची साद चक्क हायकोर्टात घालावी लागली आहे. सेवाभावी संस्थांच्या मदतीने पुढाकार घेऊन सुरु केलेले हे कोविड सेंटर डॉक्टर आणि सर्व स्टाफ असूनही ऑक्सिजनचा पुरवठाच होत नसल्याने सुरु झालेला नाही .आता यात राजकारण आहे कि वस्तुस्थिती आडवी येते आहे हा भाग वेगळा पण न्याय मागायला जिथे आर्त हाक घातली जाते आता तिथे ऑक्सिजन च्या मागणीसाठी हि पुकारा होऊ लागणार आहे .
पुणे महानगरपालिका हददीतील कोविड रूग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा तातडीने करावा असे निर्देश देण्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या कोविड रूग्णालयातील बेडस व शासकीय बेडस हे ऑक्सिजन मिळत नसल्याने रिक्त आहेत. मनपा कोविड रूग्णालये व शासकीय बेडस हे पुणे महानगरपालिका व राज्य शासनाद्वारे आवश्यक पायाभूत सुविधांनी सुसज्ज केलेले असून वापरासाठी तयार आहेत. सर्वसामान्य व गोरगरीब कोरोना बाधित रूग्णांना पुणे महानगरपालिकेची कोविड रूग्णालये व शासनाचे रूग्णालये येथे उपचार मिळावेत व जास्तीत जास्त कोरोना बाधितांवर उपचार व्हावेत या हेतूने आबा बागूल यांनी जनहित याचिका दाखल केलेली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेले रूग्णांना आर्थिक अडचणींमुळे खाजगी रूग्णालयात उपचार घेणे शक्य होत नाही. असे रूग्ण पुणे महानगरपालिका व शासनाच्या कोविड केंद्रावर उपचारासाठी जातात, परंतू त्याठिकाणी ऑक्सिजन पुरवठयाअभावी कित्येक बेडस कार्यरत नसल्यामुळे त्याठिकाणी आलेल्या रूग्णांवर उपचार करणे शक्य होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आयुक्त, पुणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी, पुणे, विभागीय आयुक्त, पुणे व सचिव, अन्न व औषध विभाग, महाराष्ट्र राज्य यांची महानगरपालिका हददीतील कोविड रूग्णालये व शासकीय रूग्णालये येथे ऑक्सिजनचे वाटप, वितरण आणि नियमित पुरवठा करणे ही उपरोक्त नमूद सर्व अधिकारी यांची सामूहिक जबाबदारी आहे.
मार्च २०२० पासून कोरोना या संसर्गजन्य रोगाचा फैलाव आपल्या देशात, राज्यात व पुणे शहरात चालू झालेला असून पुणे मनपा काँग्रेस गटनेते मा.आबा बागूल यांच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत करण्याचे कार्य चालू आहे.
महाराष्ट्रातील पुणे शहरात सर्वाधिक कोरोना रूग्ण आढळून येत असून आज रोजी राज्यात सर्वाधिक सक्रीय रूग्ण पुणे शहरात आहेत. यामुळे पुणे शहरातील कोरोना बाधितांना ऑक्सिजन बेडस, व्हेंटीलेटर बेडसची तीव्र कमतरता भासत आहे. सबब गोरगरीब व सर्वसामान्य रूग्णांना योग्य व वेळेत उपचार मिळू शकत नाहीत व गोरगरीब कोरोना बाधितांवर वेळेत उपचार न मिळाल्याने गोरगरीबांचा दुर्देवी मृत्यु होत असून अनेकजण रस्त्यावर व अँम्ब्युलन्स मध्ये मृत पावत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे पुणे शहरातील कोरोनामुळे मृत्यु होण्याची संख्या जास्त असून मृत्युचा दर वाढत आहे. ही संख्या बघता यामध्ये गोरगरीब व मध्यमवर्गीय यांची संख्या सर्वाधिक आहे.
सध्या कोरोनाची दुसरी लाट असून तिसरी लाट जोरात येईल असे जागतिक तज्ञांकडून सांगितले जात आहे. पुणे शहरात ग्रामीण भागातून येणा-या रूग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे. भविष्याचा वेध घेत मृत्युचा दर कमी ठेवण्यासाठी गोरगरीब व मध्यमवर्गीय यांचेसाठी पुणे महानगरपालिका कोविड रूग्णालये व शासकीय रूग्णालये यांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुरवठा करणेबाबत उपाय योजना आखणे गरजेचे आहे. पुणे महानगरपालिकेने कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेवून जंबो रूग्णालय, दळवी रूग्णालय, बाणेर रूग्णालय, लायगुडे रूग्णालय, गणेश कला क्रीडा मंच व इतर असे कोविड रूग्णालये उभारलेली आहेत. तसेच अतिरिक्त कोविड रूग्णालये उभारण्याचा देखील पुणे महानगरपालिका प्रयत्नात असून सदर रूग्णालये ऑक्सिजन पुरवठया विना पडून राहणार आहेत. सदयस्थितीत गणेश कला क्रीडा मंच येथे १२० बेडसची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली असून ऑक्सिजन पुरवठया विना पडून आहेत.
पुणे महानगरपालिका हददीतील खाजगी रूग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा होत असून त्याठिकाणचे बेड कार्यरत आहेत. परंतू आर्थिक अडचणींमुळे प्रत्येकाला खाजगी रूग्णालयात उपचार घेणे शक्य होत नाही. अशा रूग्णांसाठी मनपाची कोविड रूग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्यात यावा अशी आबा बागूल यांनी प्रमुख मागणी केलेली आहे.