पुणे- तूरडाळ गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावरील मानहानीचा दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरिश बापट यांनी शुक्रवारी मागे घेतला. गिरीश बापट आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ता नवाब मलिक दोघेही शिवाजीनगर कोर्टात हजर झाले. गिरीश बापटांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यासंदर्भात सुनावणी झाली. गिरीश बापट यांच्यावर करोडो रुपयांचा तूर डाळ घोटाळा केल्याचा आरोप मलिकांनी केला होता. दरम्यान, गिरीश बापट यांनी माघारी घेतली आहे.
काय आहे हे प्रकरण?
जीवनाश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाई करून जप्त केलेल्या तूरडाळीच्या साठ्याची योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आल्यानंतरच राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने जप्त केलेल्या डाळीचा जाहीर लिलाव करण्याचे ठरवले, असे सांगत, यात दोन हजार कोटींचा घोटाळा झाला असून, त्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा सहभाग आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
तूरडाळीच्या किंमती भडकल्यानंतर कॅबिनेट सेक्रेटरी पी.के. सिन्हा यांनी विविध राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर, म्हणजे 18 नोव्हेंबर रोजी सिन्हा यांनी कायद्यानुसार या डाळीची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सरकारची ‘जप्त डाळीचा जाहीर लिलाव करणार’ ही घोषणा फसवी आहे. डाळीचे साठे जप्त केले असताना चालढकल का? राज्यातील जनतेच्या ताटातील डाळ चोरणारर्या साठेबाज व्यापार्यांवर काय कारवाई केली? असे सवालही मलिक यांनी केले होते.