मराठी फिल्म इंडस्ट्रीचा हार्टथ्रोब गश्मीर महाजनीने २००० साली पूण्यामध्ये त्याचा डान्स स्टुडियो सुरू केला. यंदा त्याच्या डान्स स्टुडियोला १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. शुक्रवारी ह्या डान्स स्टुडियोचा वार्षिक समारंभ झाला. ज्याला स्टुडियोच्या विद्यार्थ्यांसह पूणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. पूण्याचे यशवंतराव नाट्यगृह तर उत्साही डान्सप्रेमींनी नुसते भरून गेले होते.
गश्मीर महाजनी त्याच्या डान्स स्टुडियोच्या विद्यार्थ्यांचे मेकअप-हेअर-एक्सेसरीज-कॉस्च्युम, परफॉर्मन्सेससाठीचे प्रॉप्स ते कार्यक्रम आयोजित करताना उभारावे लागणारे सेट्स-लाइट्स असं सगळं जातीने पाहत होता. यशवंतराव नाट्यगृहात आयोजित होणारा हा वार्षिक समारंभ भव्य आणि लॅविश करण्यावर त्याचा भर दिसून येत होता. कथ्थक पासून ते बॉलीवूड डान्स नंबर आणि हिपहॉपपर्यंत सर्व डान्स प्रकार ह्या कार्यक्रमात पाहायला मिळाले. पूण्यातल्या डान्स एकेडमींमध्ये फक्त जीआरएम डान्स स्टुडियोमध्येच टॉलीवूड डान्सिंगचा वर्कशॉप घेतला जातो. त्यामूळे टॉलीवूड डान्स एक्ट वार्षिक समारंभातले मुख्य आकर्षण असते.
वार्षिक समारंभाच्या सुरूवातीला जीआरएम डान्स स्टुडियोने सीमेवर लढणा-या जवानांना, अमरनाथ यात्रेत बळी पडलेल्या यात्रेकरूंना आणि शहिदांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला स्पृहा जोशी, समीर विव्दंस, सीमा देशमुख, सतीश आळेकर, असे मराठी फिल्मइंडस्ट्रीतले अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेत्री गिरीजा ओकने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि गश्मिर सोबत छोटासा परफॉर्मन्सही केला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला तो, गश्मिरचा डान्स परफॉर्मन्स. टाळ्या आणि शिट्यांच्या वर्षावात गश्मिरने त्याच्या मराठी सिनेमातल्या गाण्यांवर आणि त्याचा डान्सिंग आयडल सुपरस्टार गोविंदाच्या ‘टनटनाटन टनटन तारा’ ह्या गाण्यावर परफॉर्मन्स दिला.
जीआरएम डान्स स्टुडियोच्या वाढत्या लोकप्रियतेमूळे गेल्या वर्षीपासून जपानी डान्सप्रेमीही ह्या एकेडमीचे विद्यार्थी झाले आहेत. बॉलीवूडच्या गाण्यावर ह्या जपानी विद्यार्थ्यांचा डान्स परफॉर्मन्स खूपच मनोरंजक होता. एकेडमीच्या सूमारे १६० विद्यार्थ्यांनी वार्षिक समारंभात परफॉर्मन्स दिला.
गश्मीर महाजनी ह्यावेळी म्हणाला की, “माझ्या ह्या डान्सिंग स्टार्सचा मला अभिमान वाटतो. त्यांच्यासाठी कोरीओग्राफी करतानाही मला खूप मजा येते. आपल्या देशात खूप प्रतिभावान कलाकार आहेत, हे ह्या विद्यार्थ्यांना शिकवताना मला लक्षात येते. अशा प्रतिभावान विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळणेही गरजेचे असते. त्यामूळे मी हा वार्षिक समारंभ करतो. ३ ते ६० वर्षांच्या वयोगटातल्या माझ्या विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सनंतर त्यांच्या घरच्यांच्या चेह-यावरचा आनंद मला समाधान देतो.“