श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; आॅगमेंटेड रिअॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर
पुणे : सलग दुस-या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. ट्रस्टच्या १२९ वर्षात सलग दुस-या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे. मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या आॅनलाईन दर्शन सुविधेवर व आॅनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असून आॅगमेंटेड रिअॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भक्तांना घरबसल्या मंदिराच्या गाभा-यात बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार आहे, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, डॉ.रामचंद्र परांजपे, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी मंदिरामध्येच उत्सवात गणपती विराजमान होणार आहे. मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही.
* यंदाचे वैशिष्टय – आॅगमेंटेंड रिअॅलिटी तंत्रज्ञानाचा वापरआॅगमेंटेंड रिअॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्टय असणार आहे. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भक्तांनी आॅनलाईन दर्शन घ्यावे, याकरीता या तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. याकरीता ट्रस्टतर्फे एक लिंक देण्यात येणार असून त्या लिंकवर जाऊन घरी भक्ताने आरती करतानाचा व्हिडिओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात श्रीं ची आरती करतानाचा व्हिडिओ तयार होणार आहे. आपण गाभा-यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करीत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येईल.
* विश्वस्त आणि कार्यकर्ते मंदिरात जाणार नाहीत
शासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे मंदिर बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश मिळत नाही. उत्सवाच्या काळात ट्रस्टचे विश्वस्त आणि कार्यकर्ते देखील मंदिरात जाणार नसल्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. दैनंदिन धार्मिक विधी केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. भाविकांकरीता मंदिर परिसरात दोन मोठया एलईडी स्क्रिन लावण्यात येणार असून त्याद्वारे श्रीं चे दर्शन घेता येईल. तसेच मंदिरासमोर दोन्ही बाजूला रेलिंगची सोय करण्यात येईल. यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी या स्थानाचे महत्व अबाधित रहावे, याकरीता तेथे देखील एका एलईडी स्क्रिनची सोय करण्यात आली आहे.
* मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई व दररोज २१ किलो मिष्टांनांचा भोग
गणेशोत्सवात मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. तसेच दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईसह मिष्टांनांचा भोग श्रीं समोर लावण्यात येणार आहे. याशिवाय श्रींना दररोज वेगवेगळे महाउपरणे देखील घालण्यात येणार आहे. यावर गणेशांची विविध नावे साकारण्यात आली आहेत. अष्टविनायकांची मयुरेश्वर, सिद्धीविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नेश्वर, महागणपती ही ८ नावे, दगडूशेठ आणि गणाधिश अशी १० उपरणी तयार करण्यात आली आहे. दररोज एक उपरणे श्रीं ना घालण्यात येईल. मंदिरामध्ये व परिसरात कायमस्वरुपी असलेल्या ६० सीसीटिव्ही कॅमे-यांचा वॉच देखील राहणार आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना ट्रस्टतर्फे केल्या जाणार आहेत.
* धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व दर्शनसुविधा आॅनलाईन
यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने ट्रस्टने आॅनलाईन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवार, दिनांक ११ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता प्रातिनिधीक अथर्वशीर्ष पठण व श्रीं ची महाआरती आॅनलाईन पद्धतीने होईल. तर, दि. १० ते १९ सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी महागणेश याग आणि दुपारी १ ते सायंकाळी ६ पर्यंत लक्षावर्तन, होम-हवन हे वेदमूर्ती नटराज शास्त्री करणार आहेत. तर, ब्रह्मणस्पती सुक्त पारीजात वेदमूर्ती धनंजय घाटे व ब्रह्मवृंद करणार आहे. दिनांक १७ सप्टेंबर रोजी ६ वेदमूर्ती मधुकर जांभेकर गुरुजी मंत्रजागर करणार आहेत. उत्सवकाळात श्रीं ची आरती आॅनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभविता येणार आहे. सकाळी ७.३० व रात्री ९ वाजता ही आरती भाविकांना सोशल मीडियाद्वारे घरबसल्या पाहता येईल.
श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
सामाजिक भान जपत यंदाही गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मंडपांनी घेतला आहे. मागील वर्षी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने मंदिरात उत्सव साजरा करु, अशी भूमिका घेतली. त्याचे अनुकरण सर्व मंडळांनी केले होते. त्यामुळे पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात चांगला संदेश गेला.
– मुरलीधर मोहोळ, महापौर
गणेशोत्सवाचा पुणे पॅटर्न राज्यात चांगल्या अर्थाने अनुकरणीय होईल. याची सुरुवात दगडूशेठ गणपती ट्रस्टने यंदा मंदिरात उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन केली आहे. आॅगमेंटेंड रिअॅलिटी तंत्रज्ञानाचा वापर ट्रस्ट करणार असून ज्यांना शक्य आहे, त्या मंडळांनी अशा तंत्राचा किंवा आॅनलाईन माध्यमांचा जास्तीत जास्त उपयोग करावा.
– डॉ.रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त, पुणे

