पुणे : शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावरून शास्त्री रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर बहुतांश मार्गांवरील वाहतूक सुरळीत झाली आहे. मिरवणुकीमुळे बंद असलेले शहरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत.
मिरवणूक संपताच पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश यांनी अलका चौकात येवून ,’चलो चले अपने घर …म्हणत पोलिसांच्या कामगिरीचे आज दुपारी येथे कौतुक केले. दरम्यान मिरवणुकीमध्ये चोरी करणारी मालेगावच्या एका टोळीसही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 75 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि इतर साऊंड सिस्टिमवर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रशासनामध्ये तणाव निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी नियोजन केले आणि त्याची अचूक अंमलबजावणी केल्यामुळे मिरवणुकीत त्याचा परिणाम दिसून आला, असे डॉ. व्यंकटेश यांनी येथे सांगितले.
मानाच्या ५ गणपतींचा अपवाद वगळता अन्य मंडळे इतर वर्षांच्या तुलनेत लवकर मिरवणुकीत दाखल करण्यात पोलिसांना यश आले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी विविध मंडळांवर कारवाई करून 33 उपकरणे जप्त केली आहेत; तर विविध कलमांखाली 75 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

