पुणे ःमहाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल आणि ‘संविधान घर ‘ यांच्या तर्फे ३० जानेवारी २०२२ रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित गांधी भवन, कोथरूड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महात्मा गांधी पुण्यतिथी दिवशी दरवर्षीप्रमाणे गांधी भवन येथे सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत गांधी आश्रमातील सामुदायिक प्रार्थना यावेळी संदीप बर्वे , बाबा बीडीवाले आणि गांधी भवनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सादर केली.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांचे ‘गांधी समजून घेताना ‘ या विषयावर व्याख्यान झाले.यावेळी बोलताना ते म्हणाले, गांधी, स्वातंत्र्यलढा आणि संविधान ही त्रिमूर्ती आहे. जो सच्चा भारतीय आहे तो तिन्ही मूर्तींना मानेल. तीनपैकी एका मूर्तीला मानतो तो खोटारडा आहे.सावरकरांनी द्वीराष्ट्रवादाचा सिध्दांत मांडला. स्वातंत्र्य लढ्याला कायम विरोध केला.
ते पुढे म्हणाले, हिंदुत्ववाद आणि हिंदुत्ववादाची बदनामी हिंदुत्ववादीच करतात. नथुराम गोडसे हिंदुत्ववादी होता तो पुण्यातला असावा याची खंत वाटल्याने मामासाहेब देवगिरीकरांनी महाराष्ट्र स्मारक निधीची जबाबदारी स्विकारली.
भगवे कपडे घालणारे लोक हरिद्वारच्या धर्म संसदेत मुसलमानांना संपविण्याची भाषा करतात, हत्यारे उचलायला सांगतात हा भगव्या रंगाचा अपमान आहे. आपली ही जबाबदारी आहे की , या प्रवृत्ती विरोधात आपण लढले पाहिजे.
शांतीने जो राहतो तोच खरा आनंदी आहे. हिंसा करून शत्रूचा नाश होतो असे नाही तर आत्मनाश, परनाश आणि सर्वनाश होतो. महात्मा गांधी म्हणायचे मी १२५ वर्षे जगण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु नथुराम गोडसे म्हणायचे मी त्यांना इतकी वर्ष जगू देणार नाही. पुण्यातूनच गांधी हत्येचे षडयंत्र रचले गेले . त्यामुळे गांधीजींच आणि पुण्याच एक वेगळ नात आहे. हिंदुराष्ट्राच स्वप्न साकार झाला नाही म्हणून नैराश्याने गांधीचा खून करण्यात आला.
यावेळी डॉ. प्रवीण सप्तर्षी, प्रशांत कोठडीया, डॉ. उर्मिला सप्तर्षी, कृतार्थ शेवगांवकर, गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिक श्री . खानविलकर , श्रीधर रायरीकर, डॉ. संतोष म्हस्के, पथारी व्यावसायिक संघटनेचे दीपक मोहिते, महाराष्ट्र स्मारक निधीचे विश्वस्त एम.एस. जाधव, युक्रांदचे पदाधिकारी संदीप बर्वे,जांबुवत मनोहर , अप्पा अनारसे , शालिनी पंडीत, प्रा. निलम पंडित , निर्भय गायकवाड , विनय शेडगे व नागरीक उपस्थित होते. सकाळी ११ वाजता मिनी थिएटरमध्ये श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘ संविधान ‘ या मालिकेचे दोन भाग दाखवून त्यावर चर्चा आयोजित करण्यात आली .
गांधी, स्वातंत्र्यलढा आणि संविधान ही त्रिमूर्ती – डॉ.कुमार सप्तर्षी
Date:

