मुंबई-राहुल गांधीवर सुरू असलेली ईडी कारवाई ही कोर्टाच्या निर्णयानुसार असून, त्यांनी सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. स्वातंत्र्य सैनिकांची संपत्ती हडपल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. काँग्रेसने देशात निर्माण केलेले वातावरण हे चुकीचे असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
जनतेला वेठीस धरले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज ईडीने चौकशीसाठी दिल्लीच्या कार्यालयात बोलावले होते. त्याचा निषेध म्हणून देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यावर फडणवीस म्हणाले की, काँग्रेसकडून देशातील विविध शहरांमध्ये जनतेला वेठीस धरण्याचे काम केले. ही चौकशी न्यायालयाच्या निर्णयानुसार झाली. AJL च्या संदर्भात असोसिएट जर्नल लिमिटेड ही कंपनी 1930 साली स्वातंत्र सैनिकांनी तयार केली. त्यांचे एक मुखपत्र असायला पाहिजे याकरिता 5 हजार स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येत ही कंपनी स्थापन केली. मात्र, 2010 साली राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने एक ‘यंग इंडियन’ नावाची कंपनी तयार करून 5 लाख रुपयांची कंपनी तयार केली. असोसिएट जर्नल लिमिटेडचे सगळे शेअर हे या कंपनीच्या नावाने हस्तांतर करून असोसिएट जर्नल लिमिटेडच्या 2000 कोटींच्या संपत्तीवर आपली मालकी प्रस्थापित केली.
हा भ्रष्टाचार आहे
फडणवीस पुढे म्हणाले की, 2019 मध्ये दिल्ली हायकोर्टाने सांगितले की, हा भ्रष्टाचार आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरच ईडीने ही चौकशी केली आहे. यासंदर्भात देशात जो काही वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे हा चुकीचा आहे. 5 हजार स्वातंत्र्य सैनिकांची सैनिकांची 2000 कोटी रुपये हडपल्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. AJL ही राष्ट्रीय संपत्ती असून, त्याला जर कोणी हडपण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यासंबंधी कारवाई होणे हे अतिशय स्वाभाविक आहे.