पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त पुण्यात २ ऑक्टोबर रोजी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
गांधीजींच्या जीवनकार्यावरील फोटो प्रदर्शन, तिकिटांचे प्रदर्शन ,भजन, डॉ कुमार सप्तर्षी यांचे व्याख्यान, ‘गांधी ‘ चित्रपट , खादी वस्तूंचे प्रदर्शन असे कार्यक्रम महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधी भवन , कोथरुड ) येथे उत्साहात पार पडले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी , विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेआठ वाजता कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यांनतर सर्वधर्मप्रार्थना ,शुभांगी मुळे यांचे भजन झाले . गांधीजींच्या जीवनकार्यावरील फोटोचे ,टपाल तिकिटांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
‘महात्मा गांधींच्या विचारांचा वर्तमान काळातील संदर्भ ‘ या विषयावर डॉ कुमार सप्तर्षी यांचे व्याख्यान झाले . दुपारी साडेबारा वाजता ‘गांधी’ हा ऑस्कर विजेता चित्रपट गांधी भवन मधील मिनी थिएटर मध्ये दाखविण्यात आला. १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या काळात गांधीभवन आवारात खादी आणि विविध वस्तूंचे, स्टॉल्सचे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळात सुरु राहणार आहे.
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ आपणही महात्मा होऊ शकतो हा विश्वास मोहनदास करमचंद गांधी आपल्याला देतात. सत्याग्रह ही कार्यपद्धती आहे. या मार्गाने उशीर होईल, पण यश मिळतेच. सत्याग्रहाची गरज संपली असे भासवले जात असले तरी ते सत्य नाही. गांधींजींच्या विचाराची प्रासंगितता, सार्वकालिकता संपलेली नाही.पर्यावरण प्रेम, शाश्वत विकास, खेडयाकडे जाण्याची प्रेरणा अशा अनेक गोष्टी आपण आजही पाहू शकतो. चंगळवाद, द्वेषाचे राजकारण, भांडवलशाहीला गांधीवाद हेच उत्तर आहे. गांधींना टाळता येणार नाही ‘.
यावेळी डॉ. उर्मिला सप्तर्षी, विकास लवांडे, अरुण खोरे, संदीप बर्वे, रवींद्र धनक, इत्यादी उपस्थित होते.
गांधींना टाळता येणार नाही : डॉ.कुमार सप्तर्षी
Date:

