कृषिपंप वीजजोडणी धोरणातून विविध कामांना ‘ऊर्जा’
पुणे, दि. २२ फेब्रुवारी २०२२: शेतकऱ्यांनी भरलेल्या चालू व थकीत कृषी वीजबिलांच्या रकमेतील तब्बल ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील वीज यंत्रणेच्या विविध कामांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला मोठा वेग आला आहे. आतापर्यंत पुणे जिल्हयात २११ कोटी ८२ लाख रुपयांचा कृषी आकस्मिक निधी जमा झाला असून १६ हजार ४४२ कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागाला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वीजबिलांच्या भरण्यातील ६६ टक्के रक्कम कृषी आकस्मिक निधी म्हणून स्थानिक वीजविषयक कामांसाठी वापरण्याची तरतूद केली आहे. त्याचे चांगले फायदे आता दिसू लागले आहेत. ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात कृषी वीजबिले जशी भरली जातील तसा हा निधी देखील वाढत जाणार आहे. या निधीतून महावितरणकडून संबंधीत ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे सुरु झाली असून ग्रामीण भागात नवीन वीजजोडण्यांसह योग्य दाबासह दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होत आहे.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५३ हजार ५८४ शेतकऱ्यांनी कृषी धोरणातील थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग घेतला आहेत. त्यांनी चालू व थकीत वीजबिलांपोटी २७५ कोटी ७४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. या रकमेमधून ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी १०५ कोटी ९१ लाख असे एकूण २११ कोटी ८२ लाख रुपये कृषी आकस्मिक निधीमध्ये जमा झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७ नवीन उपकेंद्र व ७ उपकेंद्रांची क्षमतावाढ या निधीमधून प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यातील २८ कोटी १२ लाख रुपये खर्चाचे ७ नवीन उपकेंद्र व चार उपकेंद्रांच्या क्षमतावाढीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यासह जिल्ह्यात ८४ कोटी ९५ लाख रुपये खर्चाच्या १५०६ विविध कामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. कृषी आकस्मिक निधीमधून आतापर्यंत ३७ कोटी ७३ लाख रुपये खर्चाचे १२५८ कामे सुरु करण्यासाठी कामाचा आदेश देण्यात आला आहे. त्यातील ९६३ कामे प्रगतीपथावर आहे तर २९५ विविध कामे पूर्ण झाली आहेत.
ग्रामीण भागात सुरु असलेल्या वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणामुळे आतापर्यंत पुणे जिल्ह्यात १६ हजार ४४२ कृषिपंपांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. कृषिपंपाच्या चालू व थकीत वीजबिलांचा सर्व शेतकऱ्यांनी भरणा केल्यास संबंधित ग्रामपंचायत व पुणे जिल्ह्याच्या प्रत्येकी ३३ टक्के कृषी आकस्मिक निधीमध्ये वाढ होत जाणार आहे. या निधीमधून नवीन उपकेंद्र, उपकेंद्रांची क्षमता वाढ किंवा अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर, नवीन वितरण रोहित्रे, नवीन वीजखांब व उच्चदाब, लघुदाब वाहिन्या आदी विविध कामे करण्यात येणार आहेत. तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांनी येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत चालू वीजबिल व सुधारित थकबाकीतील ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ होणार आहे. थकबाकीमुक्ती सोबतच कृषी वीजबिलांचा नियमित भरणा करून कृषी आकस्मिक निधीच्या माध्यमातून ग्रामपंचायत व जिल्हाक्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी हक्काचा निधी मिळवावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

