ईडी च्या कारवाई नंतर आमदार असलेले नेमके प्रताप सरनाईक कोण आहेत, त्यांचा जीवनप्रवास कसा आणि ते किती कोटी संपत्तीचे मालक आहेत ? याविषयी आज उत्सुकता लागून होती. त्यांच्या विषयी मिळालेली माहिती अशी आहे कि, प्रताप सरनाईक यांचा जन्म वर्ध्यामध्ये झाला. ते आज 65 वर्षांचे आहेत. लहानपणीच ते वर्ध्यामधून मुंबईत स्थाइक झाले. त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. डोंबवली पूर्वेतील एस. व्ही. जोशी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण घेतले
रिक्षाचालक ते सक्रिय राजकारणी
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरनाईकांनी काही काळ रिक्षाही चालवली. यानंतर त्यांनी 1997 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्तव घेत सक्रीय राजकारणात उडी घेतली. 1997 साली ते पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर 2008 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
125 कोटींच्या संपत्तीचे मालक
प्रताप सरनाईक यांचा विहंग ग्रुप या नावाने अनेक व्यवसाय सुरू आहेत. त्यांनी 2019 साली निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची एकूण (स्थावर आणि जंगम एकत्रित) मालमत्ता 125 कोटींहून अधिक असल्याचे नोंदवले आहे.
2008 मध्ये पहिल्यांदा आमदार
2008 मध्ये सरनाईकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर 2009 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते ठाण्यातून आमदार झाले. प्रताप सरनाईक हे शिवसेनेकडून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते आमदार आहेत.
दोन पुत्र विहंग आणि पूर्वेशही राजकारणात सक्रिय
प्रताप सरनाईकांना दोन मुलं आहेत. यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव विहंग तर धाकट्या मुलाचे नाव पूर्वेश आहे. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे जवळचे संबंधत आहेत. पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आहेत. तर युवासेनेच्या कामांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होतात. तर पूर्वेश यांच्या पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत.
विहंग ग्रुप काय आहे?
विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक 1989 पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सहभागी झालेले आहेत. विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे त्यांचे रहिवासी प्रकल्प आहेत. यासोबतच घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ प्रताप सरनाईक यांचे विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेलही आहे. विहंग्ज ग्रुपकडे विहंग्ज पाम क्लबचीही मालकी आहे. यामध्ये स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जाकूझी आणि स्क्वॅश अशा विविध सोयी आहेत.

