पुणे, ता. ६ जुलै : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे पालक गमाविलेल्या राज्यातील पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना निरंतर शिक्षण मिळावे यासाठी ‘पढेगा भारत’ संस्थेच्या वतीने विनामूल्य ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा वेणू अमर साबळे यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे. या योजनेचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते येत्या गुरुवारी (ता. ८ जुलै) सकाळी १०.४५ वाजता रानडे संकुल, हिराबाग चौक, टिळक रस्ता येथे करण्यात येणार आहे.
वेणू साबळे म्हणाल्या, ‘गेल्या दीड वर्षांत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण संस्था बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. त्यात ही ज्या विद्यार्थ्याच्या कुटुंबामध्ये आई किंवा वडील किंवा दोघांचे कोरोनामुळे निधन झालेले आहे, त्यांची आर्थिक परिस्थितीही बिकट झालेली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहाण्याची भीती निर्माण झाली आहे. या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नैतिक मूल्याधारित गोष्टी, प्रात्यक्षिकांवर आधारित कृतीशील शिक्षण आणि थ्रीडी अनिमेशन तंत्रज्ञानाचा वापर ही उपक्रमाची वैशिष्ट्ये आहेत.’
संस्थेचे संस्थापक सल्लागार माजी खासदार अमर साबळे म्हणाले, जगातील आदर्श समजले जाणारे फिनलॅंड शैक्षणिक धोरण आणि आपले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यांचा तौलनिक अभ्यास करून प्रथमच महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाला अनुसरून उत्कृष्ट दर्जाचे व्हिडिओ साहित्याची निर्मिती करण्यात आली आहे. शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेतील आजी-माजी १५० तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. एकूण बाराशेहून अधिक व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. पाचवी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ते उपयुक्त ठरणार आहेत. वैयक्तिकपणे किंवा शाळेच्या माध्यमातून सामुदायिक पद्धतीने लाभार्थी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी www.padegabharat.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.’

