मुंबई-भाजप नेते किरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी आज अटक केली. याच प्रकरणात शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक दिनेश कुबल, हाजी आलम, शेखर वायगंणकर यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे.हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार या प्रकरणात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता .
अजयकुमार भल्ला महाराष्ट्रात येणार -किरीट सोमय्या
किरीट सोमय्या या नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटण्यासाठी खार पोलिस ठाण्यात आले होते तेथून परतत असताना शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नुकतीच विश्वनाथ महाडेश्वर यांनी अटक करण्यात आली. दरम्यान किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली असून आम्ही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत केंद्रातील गृहसचिवांना माहिती दिली असून लवकरच अजयकुमार भल्ला महाराष्ट्रात येणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.
खार पोलिस ठाण्यासमोर झाला होता हल्ला
मुंबईत राणा दाम्पत्यांनी केलेल्या हायव्हाेल्टेज ड्राम्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्यांना अटक केली. यानंतर शनिवारी रात्री त्यांना भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आले होते तेथून जाताना सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला चढविला, या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी झाले आणि त्यांच्या गाडीचेही नुकसान झाले होते. हल्यानंतर किरीट सोमय्यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झाली.
महाडेश्वर यांनीही मांडली बाजू
किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिवसेनेचे नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी केला होता. सोमय्याची गाडी आपल्या पायावरून गेल्याचेही ते म्हणाले होते. या घटनेनंतर वांद्रे पोलिस ठाण्यात किरीट सोमय्यांनी तक्रार दिली. तत्पुर्वी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वांद्रे पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. शिवसेनेच्या गुंडांना अटक करा अशी मागणी त्यांनी करीत शिवसेनेविरुद्ध त्यांनी घोषणाबाजीही केली होती.
हे भाजपचेच कारस्थान -मनिषा कायंदे
महाडेश्वर यांना अटक झाल्यानंतर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, भाजपकडून राष्ट्रपती राजवटीसाठी प्रयत्न सुरू असून हे सगळे त्यांचे कारस्थान सुरू आहे. यासाठी त्यांनी राणा दाम्पत्याला भाजपने कामाला लावले आहे. महाडेश्वर यांनी सोमय्या विरोधात पाऊल उचलण्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप मनिषा कांयदे यांनी केला आहे. सुरक्षा वाढवून मिळावी यासाठी खोट्या गोष्टी केल्या जात असल्याचाही आरोप मनिषा कायंदे यांनी केला.

