जपानचे 67 वर्षीय माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी नारा शहरात भरसभेत गोळीबार करण्यात आला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. नारा मेडिकल यूनिव्हर्सिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण, ते फोल ठरले. अखेर दुपारी 2.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर संपूर्ण जगातून शोक व्यक्त केला जात आहे.आबेंवर गोळीबार झाला त्यावेळी ते एका प्रचारसभेल संबोधित करत होते. त्यावेळी गोळाबाराचा आवाज झाला व आबे जमिनीवर कोसळले. स्थानिक माध्यमांनी त्यांच्या छातीत गोळ्या घालण्यात आल्याचा दावा केला. पण नंतर त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यावरचा हल्ला धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;”माझे प्रिय मित्र अॅबे शिंजो यांच्यावर झालेल्या हल्ल्याने तीव्र दु:ख झाले. आम्ही आणि आमच्या प्रार्थना शिंजो अॅबे, त्यांचे कुटुंबिय आणि जपानच्या नागरिकांसोबत आहेत.”
भारत-जपान संबंध दृढ करण्यासाठी नेहमीच उत्कट, त्यांनी नुकतेच जपान-भारत असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून यामागामी तेत्सुया नामक 42 वर्षीय हल्लेखोराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक बंदूकही जप्त करण्यात आली आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याने आबेंवर का गोळीबार केला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण तो आबेंच्या धोरणांवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.जपानी माध्यमांनुसार, गोळी लागल्यानंतर शिंजो आबेंना हृदयविकाराचा झटकाही आला. पण, याविषयी अद्याप अधिकृत निवेदन आले नाही. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, घटनास्थळी गोळीबार झाल्यानंतर आबेंच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. जपानमध्ये रविवारी वरिष्ठ सभागृहाची निवडणूक होणार आहे. शिंजो आबे या निवडणुकीसाठी प्रचार करत होते शिंजो लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) पक्षाचे नेते होते. ते 2006-07 दरम्यान पहिल्यांदा जपानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर 2012 ते 2020 पर्यंत सलग 8 वर्षे ते या पदावर राहिले. त्यांच्या नावे सर्वाधिक 9 वर्षे जपानच्या पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम त्यांचे चुलते इसाकू सैतो यांच्या नावे होता.आबे एक जपानचे एक आक्रमक नेते होते. त्यांना अल्सरट्रेटिव्ह कोलायटिस हा एक आतड्याचा आजार होता. यामुळे 2007 मध्ये त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण डिसेंबर 2012 च्या निवडणुकांमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचा मोठा विजय झाल्यानंतर ते पुन्हा जपानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले.

