जनतेच्या पैशांची नासाडी नको
पुणे- विद्यापीठ आणि भोसलेनगर चौकातील दोन्ही उड्डाणपूल पाडून जनतेच्या पैशांची नासाडी होणार असल्याची भावना कॉंग्रेस सह राष्ट्रवादीच्या देखील काही कार्यकर्त्यात दडून बसली असताना आता दोन्ही पुल पाडण्यात येऊच नयेत अशी स्पष्ट आणि जाहीर मागणी करण्याचे धाडस अखेर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर आणि माजी मंत्री ,माजी शहराध्यक्ष बाळासाहेब शिवरकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या पुलाचा आराखडा नामवंत विदेशी तज्ज्ञांनी केला आहे. हा पूल स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत योग्य आणि उपयुक्त असल्याचेही शिवरकर यांनी म्हटले आहे.सध्या हा पूल पाडण्यासाठीचा खर्च अव्यवहार्य व अनावश्यक आहे. ‘पीएमआरडीऐ’तर्फे हा पूल पाडण्याला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली आहे.मेट्रोच्या कामासाठी हे उड्डाणपूल अडचणीचे ठरत आहेत. आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी पूल पाडण्यास विरोध केल्याने याकडे अनेकांचे लक्ष वेधले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने हे पूल पाडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.याच वेळी हे दोन्ही उड्डाणपूल पाडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल बांधताना महापालिका कोणताही खर्च देणार नाही, नवीन टेंडर मंजूर होईपर्यंत पूल पडू नये आणि वाहतुकीचे नियोजन करावे, अशा उपसुचनेसह पूल पाडायला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तर्फे हा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. हे दोन्ही पूल चुकल्याने रोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत असते.असा दावा करत हे उड्डाणपूल पडून नव्याने उड्डाण पूल उभारण्यात येणार आहेत.उड्डाण पूल आणि मेट्रो यांचा एकात्मिक आराखडा तयार करण्यात आला आहे. पीएमआरडीएकडून त्याचे काम करण्यात येणार आहे.उड्डाणपूल पाडून दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २४० कोटी रुपये खर्च होणार आहे.