पुणे- कॉंग्रेसचे माजी नगसेवक नाना वाबळे (नरसिंग ऊर्फ नानासाहेब विठ्ठलराव वाबळे)यांचे आज येथे दुखःद निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते . काही दिवसांपासून ते आजारी होते . उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालविली . त्यांच्या मागे पत्नी २ विवाहित मुले असा मोठा परिवार आहे. त्यातील महेश वाबळे हे आता भाजपाचे विद्यमान नगसेवक आहे.
१९८५ साली बॅॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ आणि प्रकाश ढेरे यांनी नानांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळवून दिली आणि ते या निवडणुकीत विजयी झाले . यावेळी २ वर्षे महापालिकेला वाढवून मिळाली त्यामुळे ते ७ वर्षे नगरसेवक होते. २ वेळा पी एम टी अध्यक्षपदाची संधी त्यांना मिळाली . त्यांच्या काळात सुरुवातीला सहकार नगर मधील ‘जयंतराव टिळकनगर’ वसण्यास काहीसा विरोध झाला होता . पण त्यांनी त्यावेळी हिकमतीने तळजाई आणि जंगल परिसराचे रक्षण करणारी भूमिका घेत मर्यादा आखून घेऊन ते वसविण्यात मोलाचे योगदान दिले , भ्रष्टाचार विरोधी आणि, मेहनती, रात्री बेरात्री नागरिकांच्या मदतीला धाऊन जाणारा कॉंग्रेसचा एकनिष्ठ सेवक अशी त्यांची प्रतिमा होती .
बारामतीजवळच्या एका जळगाव कपया खेडेगावात जिरायती शेतीवर गुजराण करणारे शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला घरात चार भावंड आणि आई-वडील. घरातली गरिबी स्वस्थ बसू देईना. रोजगाराच्या शोधात त्यांनी पुण्याची वाट धरली. खासगी कंपनीत नोकरी करताना कामगार चळवळीत ते सहभागी झाले. या काळात बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्या प्रचारात नानासाहेबांनी आघाडी घेतली. याची दखल थेट घेत त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप देखील टाकली.तत्कालीन शहर काँग्रेसचे अध्यक्ष पेनवाले यांनी त्यांना वॉर्ड अध्यक्षपदी नेमले. याच काळात साधारणपणे १९८० च्या सुमारास पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. पण अवघ्या १७५ मतांनी पराभव झाला.पुन्हा १९८५ साली निवडणुकीच्या रिंगणात उतरले.यावेळी मात्र मतदारांनी त्यांच्या कामाची पावती दिली.

