मुंबई-शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भाजपचे माजी आमदार संजय देशमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांच्यासाठी हे मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे. संजय देशमुख हे राठोड यांचे राजकीय विरोधक असल्याने ठाकरे गटाकडून देशमुखांना बळ दिले जात असल्याची चर्चाही रंगू लागली आहेत. दरम्यान, संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा केली आहे. मी पोहरा देवीचे दर्शन घेण्यासाठी नक्की येणार आहे. मेळाव्यासाठी तुम्ही तारीख ठरवा. मी आलोच, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.महाराष्ट्रातील संस्कारी माणसांना जे झालं ते पटलेलं नाही. ज्यांचा आपल्याशी संबंध येणार नाही, तसे लोक आपल्यासोबत येत आहेत. वेगवेगळ्या धर्माचे लोक सोबत येत आहेत. तुम्ही फक्त लढा. जे होत आहे ते आम्हाला पसंद नाही, असे मला लोक म्हणत आहेत. या देशातील लोकशाही वाचवण्याचा हा प्रयत्न आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, संजय देशमुखांच्या या ठाकरे गटातील प्रवेशानंतर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“बाळासाहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन मी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत काम करतो आहे. यापुढेही माझं काम याच पद्धतीने चालणार आहे. कोण कुठं जातो, त्याने मला फरक पडत नाही. मी माझं काम प्रमाणिकपणे करत राहील”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी दिली आहे.


