पुणे-भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी तथाकथित कालिचरण महाराज आणि भाजपाचे माजी नगरसेवक आणि समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह सहा जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.मिलिंद रमाकांत एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक बाबूलाल नागपुरे, कालिचरण (रा. अकोला), कॅप्टन दिगेंद्रकुमार (रा. राजस्थान), नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. खडक पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सोमनाथ दादा ढगे यांनी याबाबत फिर्याद दिली. १९ डिसेंबर रोजी शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानात हा कार्यक्रम आयोजित केला होता. समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे शिवप्रतापदिन आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी हजर राहून आरोपींनी मुस्लीम व ख्रिश्चन धर्माच्या नागरिकांच्या भावना दुखावल्या जातील. तसेच, धार्मिक श्रद्धांचा अपमान व हावभाव करून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, असे भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे केली.
सूत्रसंचालन करताना नंदकिशोर एकबोटे यांनी इतरांच्या भाषणांचा त्यांच्या बोलण्यात पुन्हा थोडक्यात उल्लेख करून तेथे जमलेल्या लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आरोपींनी केलेल्या भाषणाच्या क्लिपची पडताळणी केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. खडक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गाडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.