अरब जगतातील वर्ष २०१६ च्या आघाडीच्या भारतीय नेत्यांमध्ये समावेश
‘अल अदील ट्रेडिंग’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय (जय) दातार यांचा ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’तर्फे नुकताच अरब जगतातील वर्ष २०१६ चे आघाडीचे ३३ वे भारतीय नेते म्हणून गौरव करण्यात आला. ‘फोर्ब्स एमई’सारख्या अत्यंत विश्वसनीय माध्यमगृहातर्फे हे मानांकन प्राप्त होणे, हा मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया ‘मसाला किंग’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणाऱ्या डॉ. दातार यांनी व्यक्त केली आहे. ‘फोर्थ टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड २०१६ ॲवॉर्ड्स’ हा पुरस्कार सोहळा नुकताच संयुक्त अरब अमिरातीत (युएई) वॉल्डॉर्फ ॲस्टोरिया दुबई पाम जुमैरा येथे संपन्न झाला. कर्तृत्ववान भारतीयांचे यश साजरे करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘अल अदील ग्रुप’चे संस्थापक डॉ. दातार हे प्रामुख्याने रीटेल क्षेत्रात कार्यरत असून ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’च्या आघाडीच्या १०० भारतीय नेत्यांच्या मानांकन यादीतील बहुधा एकमेव महाराष्ट्रीय आहेत.
आखाती क्षेत्रातील अनिवासी भारतीयांनी या भागाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’तर्फे दरवर्षी १०० भारतीय उद्योजकांना पारितोषिके दिली जातात. यंदा बहुराष्ट्रीय कंपन्या व अरब कंपन्यांतील कार्यकारी व्यवस्थापनातील आघाडीचे ५० भारतीय अशी आणखी एक मानांकन यादी प्रसिद्ध करण्यात आली. अरब क्षेत्राच्या प्रगतीप्रती या भारतीयांची आकांक्षा व त्यांनी दिलेले योगदान यांचा गौरव करण्यासाठी ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’ने अरब जगतातील आघाडीच्या भारतीयांची आपली बहुप्रतिक्षीत यादी समारंभपूर्वक जाहीर केली. या कार्यक्रमाला अनेक नामवंत उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे संयुक्त अरब अमिरातीतील राजदूत टी पी. सीताराम आणि अन्य ख्यातनाम पाहुण्यांबरोबर उपस्थित होते.
हे मानांकन म्हणजे अरब जगतात निवास करणाऱ्या आणि तेथे व्यवसाय असणाऱ्या भारतीय व्यावसायिकांचा सखोल अभ्यास व विश्लेषणाचे फलित आहे. प्रारंभी २५० व्यावसायिकांची यादी तयार केली गेली आणि नंतर त्यातून १०० उद्योजकांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली. प्राथमिक साधनसामग्रीद्वारे गोळा केलेली माहिती व या उद्योजकांकडून भरुन घेतलेली प्रश्नावली यावर हे संशोधन आधारित असते. ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’ हा व्यावसायिक माहिती व सहयोगाचा प्रमुख संदर्भ बिंदू आहे, जो पश्चिम आशियाच्या विविध क्षेत्रांतील निर्णयकर्ते व गुंतवणूकदारांना साह्य करतोच, परंतु अरब जगतातील आर्थिक विकासही पुढे नेतो. हे मानांकन जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही चांगले परिणाम घडवण्यास कारणीभूत ठरते.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. दातार म्हणाले, की गौरव आणि सन्मान आमच्या कामाची जबाबदारी अधिकच वाढवतात. आमच्या ग्राहकांना सामाजिक जबाबदारीच्या मार्गाने मूल्यवृद्धी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यावर माझी दृढ श्रद्धा आहे. या सन्मानासाठी मी ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’चे आभार मानतो. आमच्या संपूर्ण समूहाच्या समर्पित सांघिक प्रयत्नांचेच हे प्रतिबिंब आहे. मी या महान देशाच्या राज्यकर्त्यांचेही आभार मानतो, ज्यांनी आमच्या कार्याला नेहमी मदत आणि प्रोत्साहन दिले आहे. यादीतील बहुसंख्य आघाडीचे नेते व उद्योजक संयुक्त अरब अमिरातीत स्थाईक असल्याचे आढळते. आम्हाला या देशातील नेत्यांकडून मिळत असलेल्या पाठिंब्याचेच हे स्पष्ट प्रतिबिंब आहे.
‘अल अदील ट्रेडिंग’ने डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे. त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स’ या नावाने मुंबईत कार्यरत आहे. ‘अल अदील’ समूहाचे ३१ आऊटलेट्स, २ पिठाच्या गिरण्या व २ मसाल्याच्या गिरण्या असे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने मुंबईत आहे. ‘अल अदील’ समूह सक्रिय विस्ताराच्या टप्प्यात असून त्याने नुकतीच ओमान व बहारीनमध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली व एरित्रिया, तसेच कुवेत, ओमान व संयुक्त अरब अमिरातीत विशेष व्यापारी मार्ग स्थापन करुन आयात व निर्यात क्षेत्रातही विस्तार साधला आहे.
फोटो ओळी –‘अल अदील ट्रेडिंग’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉ. धनंजय (जय) दातार यांना ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’तर्फे नुकतेच अरब जगतातील वर्ष २०१६ मधील ३३वे आघाडीचे भारतीय नेते म्हणून गौरवण्यात आले. भारतीय उद्योगपतींचे हे यश साजरे करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीतील वॉल्डॉर्फ अस्टोरिया दुबई पाम जुमैरा येथे आयोजित केलेल्या एका शानदार समारंभात डॉ. दातार यांनी हा सन्मान भारताचे संयुक्त अरब अमिरातीतील राजदूत टी. पी. सीताराम यांच्या हस्ते स्विकारला.