पुणे-जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा थांबवलाय. कोणतीही सूचना न देता जलसंपदा विभागानं पाणी पुरवठा बंद केलाय. पुण्यात २४ तास पाणी पुरवठ्याची योजना प्रस्तावित आहे. त्यासाठी वॉटर मीटर बसवले जाणार आहेत. ही योजना २८०० कोटी रुपयांची आहे. त्यातील २२५० कोटी रुपये कर्ज रोख्यांमधून उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र, मंगळवारी दुपारी कर्ज रोख्यातून २२५० कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने फेटाळला. हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर काही तासातच जलसंपदा विभागाने पाणी पुरवठा बंद केला.
यंदाच्या वर्षी पुणे शहराला पाणी पुरवठा करणा-या चारही धरणे शंभर टक्के भरली होती. त्यामुळे पुणेकराची दिवसाआड पाणी पुरवठयावरून पालकमंत्री विरुध्द महापौर असे शाब्दिक युध्द पेटले होते. राष्ट्रवादी कॉग्रेसकडून त्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभा केले होते. आता पुन्हा पाण्यावरून संघर्ष पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून काल रात्री पाटबंधारे विभागाने पुण्याला पाणी देणे बंद केले आहे. पाटबंधारे विभागाने पाण्याचा निर्णय मागे न घेतल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. यामुळे भाजप विरुध्द राष्ट्रवादी असे युध्द दिसणार हे निश्चित मानले जात आहे.
पुण्यात बाराशे एमएलडीपेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचा ठपका ठेवत जलसंपदा खात्यानं ही कारवाई केली आहे, मात्र हा आरोप खोटा असून राजकीय सुडापोटी पालकमंत्री गिरीष बापट यांनी ही कारवाई केल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केला आहे. त्यामुळे पुण्याच्या पाण्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.