शि.प्र.मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातर्फे विज्ञान सर्वत्र पूज्यते विज्ञान प्रसार महोत्सव ; एरो मॉडेलिंग शो चे आयोजन
पुणे : राफेल…फायटर प्लेन…उडती तबकडी…फ्लाईंग फिश… ग्लाईडर..अशी विविध प्रकारची विमाने अवकाशात उंच झेपावली. तब्बल १२ प्रकारची विमाने २०० फूट अवकाशात उंच उडत असताना शि.प्र. मंडळीच्या विविध शाखांतील विद्यार्थी, विज्ञानप्रेमी व पुणेकरांनी एरो मॉडेलिंग शो चा आनंद घेतला. तसेच भारतीय हवाई दलाच्या कार्याला सलाम केला.
सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, मुख्य वैज्ञानिक सल्लागार समिती भारत सरकार यांचे कार्यालय आणि विज्ञान प्रसार यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान सर्वत्र पूज्यते या विज्ञान प्रसार महोत्सवाचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळीचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. एरो मॉडेलिंग शो ला शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य अॅड. मिहीर प्रभुदेसाई, सदस्य राजेंद्र पटवर्धन यांसह प्रमुख पाहुण्या म्हणून अमिता जैन उपस्थित होते. सदानंद काळे व सहका-यांनी हा एरो मॉडेलिंग शो दाखविला व विमानांची माहितीही दिली.
अॅड. मिहीर प्रभुदेसाई म्हणाले, मुस्कान या संकल्पनेवर आधारित एरो मॉडेलिंग शो चे आयोजन करण्यात आले. दिव्यांग देखील सामान्य मुलांप्रमाणे आहेत. त्यामुळे वि. रा. रुईया मूकबधिर विद्यालयातील मुलांना देखील यावेळी सहभागी करून घेण्यात आले. यानिमित्ताने त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिनांक १७ डिसेंबर १९०३ रोजी विमानाचा शोध लागला. पक्षी बघून मानवाने विमानाचा शोध लावला होता, त्यामुळे फ्लाइंग ईगलच्या उड्डाणाने शो ला सुरुवात झाली. त्यानंतर विविध प्रकारच्या विमानांचे उड्डाण स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात झाले.
महोत्सवात भारतीय वैज्ञानिकांवर आधारित विज्ञान चित्रपट महोत्सव, विज्ञान कविता, रंगावली, नाटक स्पर्धा देखील पार पडली. दरम्यान, डॉ.गिरीश टिल्लू, प्रा.योगेश शौचे, अनिरुद्ध देशपांडे, प्रशांत दुराफे, राघवेंद्र गायकैवारी, संजय इनामदार, प्रा.संजय ढोले, डॉ.दिप्ती साठ्ये आदी मान्यवरांची व्याख्याने देखील आयोजित करण्यात आली होती. महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने यामध्ये विज्ञानप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन शि.प्र.मंडळी तर्फे करण्यात आले आहे.
…अन् अवकाशात झेपावली फायटर प्लेन
Date:

