एसटीच्या ताफ्यात येणार पाच हजार इलेक्ट्रिक आणि दोन हजार डिझेल बसगाड्या;पाच हजार डिझेल बसगाड्यांचे होणार एलएनजीमध्ये रुपांतर

Date:

मुंबई, दि.१८ – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने ‘एलएनजी’ मध्ये रुपांतर करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून स्वच्छता-टापटीपपणा ठेवून गाड्यांची निगा राखा आणि राज्यातील जनतेला दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आज दिले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची ३०२ वी बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनोटिया, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने, कामगार आयुक्त सुरेश जाधव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांचेसह एसटी महामंडळ, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत, यापूर्वीच्या बैठकीत मान्यता मिळालेल्या दोन हजार बसेस घेण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये वाढ करून ५ हजार१५० इलेक्ट्रिक बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्यता दिली. या बसगाड्या घेण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून कर्ज घेण्यासही मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. इलेक्ट्रिक बसेस या वातानुकुलित असल्याने त्याचे सध्याच्या वातानुकूलित बसेस पेक्षा तिकिटदर कमी ठेवून सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

सीएनजी बसेससाठी चेसिस उपलब्ध होत नसल्याने आणि सीएनजी पंपांची कमी संख्या पाहता सीएनजीऐवजी दोन हजार डिझेल बसगाड्या वाहने एसटीच्या ताफ्यात घेण्यास आणि पुणे व सांगली विभागाकरिता १८० बसगाड्या भाडेतत्वावर घेण्यासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे ‘एलएनजी’ मध्ये रुपांतरण होणार
डिझेलवर धावणाऱ्या पाच हजार बसगाड्यांचे लिक्विफाईड नॅचरल गॅस (एलएनजी) इंधनामध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. यामुळे डिझेलच्या प्रचलित दरापेक्षा २० ते २५ टक्के कमी दराने एलएनजीचा पुरवठा होणार आहे. शिवाय संपूर्ण बस वातानुकुलित असल्याने कमी पैशांमध्ये प्रवाशांना प्रवास करता येईल. हे काम पुरवठादार कंपनीकडून करण्यात येणार असून सुरुवातीला यात महामंडळाला कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ करण्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मान्यता दिली आहे. महामंडळाचे सुमारे ९२ हजार अधिकारी-कर्मचारी असून त्यांना पूर्वी मिळणारा २८ टक्के महागाई भत्ता आता ३४ टक्के दराने मिळणार आहे. सुमारे १५ कोटी रुपयांची मासिक वाढ वेतनखर्चात होणार आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सन २०१६-१७ ते २०२१-२२ या सहा वर्षांसाठीच्या वेतनसुधारणेच्या प्रस्तावास देखील यावेळी मंजुरी देण्यात आली.

सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणाऱ्या अतिरिक्त उपदान मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त उपदान तथा कर्मचारी ठेव निगडित विमा योजनेंतर्गत आर्थिक लाभाची मर्यादा ६ लाख १५ हजारांवरुन ७ लाख ५ हजार करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.

ॲंड्राईडवर आधारित यंत्रातून मिळणार तिकिटे
ॲंड्राईडवर आधारित ईटीआय यंत्राद्वारे प्रवाशांना एसटी बसची तिकीटे मिळणार आहेत. डेबिट, क्रेडिट कार्ड, गुगल पे आदी ऑनलाईन पेमेंटद्वारे प्रवाशांना आता तिकिटे मिळणार आहेत. त्याशिवाय मोबाईल ॲप-संकेतस्थळाद्वारे आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच महामंडळाचे आंतरसंवादी नवीन संकेतस्थळ करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. नवीन संकेतस्थळ तयार झाल्यानंतर चॅट बॉट, तक्रार निवारण सुविधा, बसेसचे अद्ययावत वेळापत्रक आदी सुविधा देखील प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.

१ कोटी ९५ लाख ज्येष्ठ नागरिकांचा एसटीतून प्रवास
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मोफत एसटी प्रवासाची सवलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली होती, त्या सवलतीचा आजपर्यंत सुमारे १ कोटी ९५ लाख ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे, मोफत प्रवास सवलतीची ही योजना अधिकाधिक ज्येष्ठांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

टाळेबंदी काळातील परवाना शुल्कात एसटी स्टॉल्सला सवलत
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात झालेल्या टाळेबंदीमुळे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात बसस्थानकांवरील परवानाधारक वाणिज्य आस्थापनांना परवाना शुल्कात सवलत देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. टाळेबंदीच्या मार्च ते ऑगस्ट २०२० या काळासाठी १०० टक्के, एप्रिल ते जून २०२१ साठी ५० टक्के आणि नोव्हेंबर २१ ते एप्रिल २०२२ या संप कालावधीत परवाना शुल्कात ७५ टक्के सवलत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या सवलतीचा सुमारे ३२०० परवानाधारक दुकानदारांना लाभ होणार आहे.
नाशिक महानगरपालिकेला शहर बस वाहतूक सुरु करण्याकरिता निमाणी, भगूर, नाशिकरोड, सातपूर येथे एसटी महामंडळाची आस्थापना आणि मोकळ्या जागा रेडीरेकनरप्रमाणे दर आकारुन भाडेतत्त्वावर देण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली.

एसटीचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांना सहप्रवाशी सुविधा
एसटी महामंडळाचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांना वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा लाभ देण्यास तसेच त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशास मोफत प्रवासाची सवलत देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. श्री. केवटे यांचे वय ९८ वर्षे असून विशेष बाब म्हणून वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा लाभ देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

अपघातप्रवण जागांजवळील अतिक्रमणे काढा- मुख्यमंत्री
राज्यातील एक हजारपेक्षा अधिक अपघातप्रवण जागा असून अपघात टाळण्यासाठी त्या भागात असलेले अतिक्रमणे काढण्याबरोबरच चालकांना स्पष्ट दिसतील असे फलक लावण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

एसटीच्या पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना
एसटी बसेसची रंगरंगोटी करुन स्वच्छता ठेवा, फाटलेली आसने बदला, बसगळती रोखण्यासह फुटलेल्या काचा बदलून नव्याने लावा आणि एसटीच्या या पंचसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...