पुणे – शाळेच्या आवारातच मिकी-माऊस, डोरो मन,चुटकी…गाण्याच्या सुरात स्वागत..प्रथमच शाळेत आलेल्या चिमुकल्यांनी आई-बाबांचे बोट सोडले आणि आनंदात हरपले, हे चित्र राजीव गांधी ई-लर्निंग स्कुलमध्ये सोमवारी पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे आयुष्यातील शाळेच्या पहिल्याच दिवशी या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरची भीती दूर झाल्याने पालकांचे चेहरेही आनंदाने फुलले.

दोन वर्षे जीवघेण्या कोरोनाला आपण सर्व सामोरे गेलो.’वर्ग बंद…ऑनलाईन शिक्षण घरातून’ हेही आपण आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले.मात्र आता कोरोनाचे सावट दूर झाले आहे.शाळाही सुरू झाल्या आहेत. कोरोनानंतर यंदा ज्युनिअर के.जी.चे वर्ग सोमवारी पुन्हा भरले.आयुष्यात प्रथमच शिक्षणाचा शुभारंभ करणाऱ्या चिमुकल्यांचा किलबिलाट आगळ्या वेगळ्या स्वागताने राजीव गांधी ई लर्निंग स्कुल,शिवदर्शन,पुणे येथे झाला. या चिमुकल्यांचे स्वागतही अनोख्या पद्धतीने झाले.कार्टून,मिकी-माऊस,डोरो मन,चुटकी स्वागतासाठी सज्ज होते,जोडीला बालगीते लावली होती. या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील भीती दूर पळाली आणि पालकांचे ‘टेन्शन’ ही हलके झाले.
पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते, माजी नगरसेवक आबा बागुल यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक वर्गांनी या चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी अमित बागुल,नंदकुमार बानगुडे, सुनील भोसले, समीर शिंदे, बाबालाल पोळके,धनंजय कांबळे, इम्त्याज तांबोळी, सुरज सोनवणे,इर्शाद शेख, महेश बानगुडे आदी उपस्थित होते.

