बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडण्यास आतशबाजी करण्यास बंदी

Date:

केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी खासगी परिसरांमध्ये फुलझडी, अनार फोडण्यास अनुमती

कोविड’च्या पार्श्वभूमीवर सजगतेने व सतर्क राहून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

‘प्रकाशाचा आणि आनंदाचा सण’ अशी ओळख असणारी ‘दीपावली’ आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ‘कोविड – १९’ च्या पार्श्वभूमीवर साजऱया होणाऱया यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी ‘कोविड’ विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाद्वारे सातत्याने व अहोरात्र पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वस्तरीय प्रयत्नांमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या ‘कोविड’ नियंत्रणात येत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसत असले, तरीही ‘कोविड’ची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे आपण सर्वांनीच अधिकाधिक काळजी काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी शारीरिक दुरीकरण कटाक्षाने पाळणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मास्क परिधान करणे आणि वारंवार साबणाने सुयोग्यप्रकारे हात धुणे या बाबींचा अवलंब करावयाचा आहे. तसेच नियंत्रित स्वरुपात दिवाळी साजरी करताना शक्यतो एकमेकांच्या घरी जाणे टाळावयाचे आहे. तसेच फटाक्यांच्या धुराचा ‘कोविड – १९’ बाधित रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणे किंवा आतषबाजी करणे यावर बंदी घालण्यात येत आहे.

त्याचबरोबर यंदाच्या दिवाळीत दारापुढे रांगोळी काढताना आणि पणत्या लावताना त्यासोबत पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजा जवळ आठवणीने ठेवायचा आहे. जेणेकरुन घरात येणा-या प्रत्येक व्यक्तिला हात – पाय – चेहरा योग्यप्रकारे धुवूनच घरात प्रवेश करता येईल, अशी मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहे. तसेच सॅनिटायजर हे ज्वालाग्रही असू शकते, ही बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या निमित्ताने दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर करू नये, अशीही मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहे.

वरील अनुषंगाने व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आणि नागरिकांना अधिक सजग राहून दिवाळीचा आनंद घेता यावा, यासाठी जारी करण्यात येत असलेले नियम व मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत :

फटाके फोडणे/आतशबाजीबाबत

• ‘कोविड – १९’ बाधित रुग्णांमध्ये श्वसनाचा मुख्य प्रश्न असतो आणि त्यांची प्राणवायू पातळी खालावण्याची संभाव्यता असते; ही संभाव्यता लक्षात घेऊन आणि फटाक्यांच्या धुराचा कोविड रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी महानगरपालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही.

• हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यवसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी आणि त्या संबंधीचे कार्यक्रम करता येणार नाहीत.

वरील दोन्ही बाबत नियमभंग करणाऱयांवर महानगरपालिका व पोलीस यांच्याद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात येईल.

• तथापि, दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी केवळ सोसायटीचे अंगण / घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरूपाचे फटाके जसे की, फुलबाजी (फुलझडी), अनार (कोठी / झाड) यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, हे करताना नागरिकांनी ‘कोविड’ विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यावयाची आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, शारीरिक दुरीकरण पाळणे व साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यावयाची आहे.

• ‘कोविड’च्या अनुषंगाने हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायजर हे ज्वलनशील असण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीचे दिवे लावताना, मर्यादित स्वरुपात आतशबाजी करताना आणि फटाके फोडताना हाताला सॅनिटायजर लावलेले नसल्याची खात्री करुन घ्यावी. सदर प्रसंगी सॅनिटायजरच्या संपर्कात येणे टाळावे किंवा सॅनिटायजरचा वापर करु नये. तसेच सॅनिटायजरची बाटली अगर कुपी आपल्याजवळ बाळगू नये.

• वरील संदर्भानुसार सदरप्रसंगी खबरदारीची उपाययोजना म्हणून हात स्वच्छ करताना सॅनिटायजरऐवजी साबण व पाण्याने हात सुयोग्यप्रकारे व नियमितपणे धुण्यास प्राधान्य द्यावे.

• वर नमूद केल्यानुसार केवळ दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी लहान मुले फुलझडी अगर अनार फटाके फोडणार असल्यास ती पालकांच्या / मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे बंधनकारक आहे. तसेच अशावेळी पाण्याने भरलेली मोठी बादली, साबण व सुती रुमाल अगर पंचा सोबत असावा.

‘कोविड’विषयक घ्यावयाची महत्वाची खबरदारी

• ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला यंदाचा दिवाळसण साजरा करताना शारीरिक दुरीकरण पाळणे, वारंवार साबणाने सुयोग्यप्रकारे हात धुणे आणि घराबाहेर पडताना किंवा घरी पाहुणे आले असल्यास त्यांच्यासह सर्वांनी सुयोग्यप्रकारे मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे.

• यंदाच्या दिवाळीत दरवाजाजवळ रांगोळी काढताना अगर दिवे लावताना त्यासोबतच आठवणीने पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजाजवळ ठेवावयाचा आहे. जेणेकरुन, घरात प्रवेश करणाऱया प्रत्येक व्यक्तिला सुयोग्यप्रकारे हात – पाय – चेहरा धुवूनच घरात प्रवेश करता येईल.

• यावर्षीची दिवाळी ही नियंत्रित स्वरुपात साजरी करावयाची असल्याने दिवाळीच्या काळात कोणत्याही प्रकारचे सामाजिक एकत्रिकरण (Social Gathering) टाळावे.

• दिवाळीच्या काळात फराळासाठी परिचितांच्या / नातेवाईकांच्या घरी जाणे टाळावे. दिवाळीच्या शुभेच्छा या दूरध्वनीद्वारे वा दृकश्राव्य प्रणालीद्वारे (Online Video Conferencing) द्याव्यात.

• वरीलनुसार भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो दृकश्राव्य प्रणालीद्वारे (Online Video Conferencing) ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी.

• अपवादात्मक प्रसंगी एखाद्या घरी जाणे आवश्यक असल्यास घरात प्रवेश करण्यापूर्वी हात, पाय व चेहरा इत्यादी व्यवस्थितपणे साबण लावून धुवून घ्यावा. त्यानंतर ओले हात – पाय पुसण्यासाठी ज्यांच्या घरी गेलो आहोत, त्यांचा रुमाल वापरण्याऐवजी स्वतःचा रुमाल वापरावा. तसेच घरात प्रवेश करताना व प्रवेश केल्यानंतर मास्क परिधान करावा.

• दिवाळीकरिता काही खरेदी करण्यासाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास शक्यतो कमी गर्दीच्या वेळी व कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...