पुणे-शहरात शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन ठिकाणी किरकोळ स्वरुपाच्या आग लागण्याच्या घटना घडल्या. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
गुरूवार पेठेतील फुलवाला चौक तसेच पौड रस्त्यावरील कचरा डेपोजवळ असलेल्या बाबाज गार्डन हॉटेलमध्ये शनिवारी रात्री किरकोळ स्वरुपाची आग लागली. दोन्ही ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत आग आटोक्यात आणली. यंदाच्या वर्षी फटाके उडविणाऱ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना कमी झाल्या, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर व्यापारी पेठेत सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. फटाक्यांमुळे धूर झाल्याने प्रदुषणातही वाढ झाली, असे अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील जवानांनी सांगितले.

