मुंबई-पूजा चव्हाण प्रकरणामुळे कोडींत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवासांपासून विरोधीपक्षाकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राठोड यांनी राजीनामा दिला आहे.
भाजपने घेतली होती आक्रमक भूमिका
विधिमंडळाचे अधिवेशन तोंडावर आहे. दरम्यान अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपने संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. जोपर्यंत राठोड यांच्यावर कारवाई केली जात नाही. तोपर्यंत अधिवेशनाचे कामकाज चालू न देण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला होता. तर उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना दोन दिवसांपूर्वीच निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.
ध्वनिफित व्हायरल झाल्यानंतर वनमंत्री सापडले अडचणीत
बीड जिल्ह्यातील परळी येथील 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी भागात आत्महत्या केली होती. या तरुणीच्या आत्महत्येस महाराष्ट्र विकास आघाडी सरकारातील वनमंत्री संजय राठोड जबाबादार असल्याचा आरोप होत होता. पूजा ज्या व्यक्तीशी बोलत आहे, अशा अनेक ध्वनिफिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या. यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती.

