कल्याण :आपल्या पहिल्याच वर्षी अतिशय नयनरम्य आणि दिमाखदार आयोजनाद्वारे रसिकांची मने जिंकलेला साई भूमी क्रिएशन आयोजित ‘कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ यंदा राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे छोट्या स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. पाच दिवसांऐवजी केवळ एक दिवसाचा चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून बचत होणारा निधी दुष्काळग्रस्तांना दिला जाणार असल्याची माहिती आयोजक संदीप गायकर यांनी दिली आहे.
2014 च्या डिसेंबर महिन्यात येथील फडके मैदानावर पहिला कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल झाला होता. अतिशय भव्य स्वरूप, दर्जेदार कार्यक्रम, उत्तमोत्तम देशी विदेशी चित्रपटांची मेजवानी, आदी ठळक कारणांमूळे या पहिल्याच फिल्म फेस्टिव्हलने रसिकांच्या डोळ्यांची अक्षरशः पारणे फेरली. परिणामस्वरूप दुसऱ्या फिल्म फेस्टिव्हलची रसिक-श्रोते आतुरतेने वाट पाहत होते. आयोजकांनीही त्यादृष्टीने जय्यत तयारी केली होती. परंतू गेल्यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात यंदा अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजकांनी सामाजिक भान जपत, फिल्म फेस्टिव्हलच्या खर्चाला कात्री दिली. पाच दिवसांऐवजी हा सोहळा फक्त 1 दिवस आणि तोही छोट्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयोजक संदीप गायकर म्हणाले. त्यानूसार येत्या 21 फेब्रूवारी रोजी कल्याण स्पोर्ट्स क्लबच्या पटांगणात कल्याण फिल्म फेस्टिव्हलच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचा सोहळा हा अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असो., वेस्टर्न इंडिया फिल्म अँड टिव्ही प्रोड्युसर असो. आणि कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असल्याचे चित्रपट दिग्दर्शक विनोद शिंदे यांनी सांगितले आहे.
तर या सोहळ्यातून बचत होणारा निधी दुष्काळग्रस्त भागाला आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला जाणार असल्याचेही गायकर यांनी स्पष्ट केले.


