पुणे- कोरोनाने मृत पावलेल्या महापालिकेच्या सेवकांच्या वारसांना केंद्र सरकारकडून ५० लाख आणि महापालिकेकडून ५० लाख रुपयांची मदत जाहीर करून प्रत्यक्षात अशी कोणतीही मदत न केल्याने हि घोषणा फसवी ठरली आहे म्हणून असे सुरक्षा कवच योजना जाहिर करणा-यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
या संदर्भात महापालिका आयुक्तांना धुमाळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि , मार्च २०२० पासून शहरात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भितीदायक होती. शासनाकडून माहे एप्रिल व माहे मे २०२० मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. यावेळी महापालिकेचे सेवक कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत नेमणूकीने कोविड सेंटर्स, विलगीकरण कक्ष व इतर कामे करत होते. तसेच शहरातील कचरा उलचणे व विविध समस्यांचे काम देखील महापालिकेच्या सेवकांकडून करण्यात येत होते. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत कामे करताना कोरोनाने आजपर्यंत ४६ महापालिकेच्या सेवकांचा मृत्यु झालेला आहे. अशा मृत पावलेल्या कुटुंबियांवर अचानक हा एक प्रकारचा अपघात असल्याने सत्ताधारी पक्षाकडून सुरक्षा कवच योजनेची घोषणा करण्यात आली. यामध्ये केंद्र शासनाकडून ५० लाखाची आर्थिक मदत व मनपाकडून ५० लाखाची आर्थिक मदत देण्यात येणार होती. तसेच कोरोनाने मृत पावलेल्या सेवकांच्या वारसाने नोकरीची मागणी केल्यास त्यास २५ लाखाची मदत देण्यात येणार असे घोषित केले होते. या घोषणांची अंमलबजावणी अदयापपर्यंत करण्यात आली नाही. सदर विषयी मुख्य सभेपुढे विषयपत्र ठेवण्यात आले आहे, त्यास मान्यता नाही असे कारण प्रशासनाकडून सांगण्यात येते. प्रशासनाकडून तातडीच्या कामासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ६७ (३) (क) अन्वये कार्यवाही करण्यात आली, अशा कामांना कायदयातून पळवाट काढण्यात प्रशासन व सत्ताधारी आग्रही दिसतात. परंतू कोरोनाने मृत पावलेल्या महापालिकेच्या सेवकांच्या वारसांना लाभ देताना कायदा दाखविला जातो, यावेळी मुख्य सभा मान्यता देईल या भरवश्यावर कार्यवाही केली जात नाही, ही बाब खेदाने नमूद करत आहोत.
पुणे महापालिकेच्या कोरोनाने मृत पावलेल्या सेवकांना वेळेत मदत न देणे हा त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय असून ही त्यांची फसवणूक आहे. आम्ही सदर प्रकरणी वारंवार पत्रव्यवहार करत आहोत, परंतू प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही, ही दुर्देवी बाब आहे. एक प्रकारे सत्ताधारी व प्रशासन कोरोनाने मृत पावलेल्या सेवकांच्या कुटुंबियांची फसवणूक करत असल्याने मनपा सेवकांसाठी सुरक्षा कवच योजना जाहिर करणा-यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

