पुणे- कोरोनामुळे ‘संचारबंदीच्या काळात रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या खासगी क्लिनिकमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या डॉक्टरांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना नाकाबंदीमध्ये अडवून ठेवू नका. डॉक्टरांचे ओळखपत्र पाहावे; तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना संबधित डॉक्टरांनी दिलेले पत्र ग्राह्य धरून सोडावे,’ अशा सूचना वाहतूक विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिल्या आहेत.
क्लिनिक सुरू केल्याने यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही यावे लागते. मात्र, सध्या शहरात संचारबंदी सुरू असल्याने जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छित ठिकाणी जाण्यासाठी डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. नाकाबंदीदरम्यान ओळखपत्र पाहूनदेखील अनेकदा डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सोडले जात नाही. धायरी येथील एका नाकाबंदीच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने डॉक्टरांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला दिलेले पत्रच फाडून फेकून दिल्याचा प्रकार घडला. पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याच्या काही तक्रारी थेट पोलिस आयुक्त यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले होते. त्यामुळे अपर पोलिस आयुक्त शिंदे यांनी याबाबतच्या सूचना सर्व पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नाकाबंदीच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना द्याव्यात, असे शिंदे यांनी दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांपासून आपली क्लिनिक बंद ठेवली आहेत. त्यामुळे करोनाव्यतिरिक्त इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना तपासण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयावर ताण येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी खासगी क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू ठेवावेत; तर काही डॉक्टरांनी पालिकेच्या रुग्णालयात येऊन इतर आजारांचे रुग्ण तपासावेत, असे आवाहन पालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले होते. त्यानुसार ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) डॉक्टरांनी त्यासाठी होकार देऊन दोन दिवसांपासून आपली क्लिनिक सुरू केली आहेत. काही जण पालिकेच्या रुग्णालयांत सेवा देण्यासाठी येत आहेत.

