पुणे : ससून रुग्णालय नियंत्रणाचे सर्व प्रशासकीय अधिकारी विभागिय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून काढून जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांच्याकडे गुरुवारी (ता.१४) देण्यात आलेपुण्यातील ससून रुग्णालयात सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची गेल्या महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर अधिष्ठातापदाचा कार्यभार डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला. तर, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय यांच्या नियंत्रण आणि प्रशासकीय निर्णयाचे अधिकार डॉ. म्हैसेकर यांना देण्यात आले होते.
त्या आदेशात बदल करून हे अधिकार आता चोकलिंगम यांना देण्यात आले आल्याचा निर्णय सरकारने घेतला. त्या बाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव संजय कमलाकर यांनी दिले आहेत.
डॉ. म्हैसेकर यांनी ससून रुग्णालयाच्या प्रशासकीय नियंत्रक पदाचा कार्यभार चोकलिंगम यांना सूपूर्द करावा. ससून रुग्णालयातील कामकाज, तेथील मनुष्यबळ आणि साधनसामग्री याची सविस्तर तपशिलवार माहिती डॉ. म्हैसेकर यांनी चोकलिंगम यांना द्यावी, असे या आदेशात म्हटले आहे.
डॉ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर अधिष्ठाता पदाची सूत्रे हाती घेतलेल्या डॉ. तांबे यांच्याकडे आर्थिक अधिकार देण्यात आले होते. ते अधिकार या कायद्याने आबाधित ठेवले आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आले नाही.
डॉ. म्हैसेकर यांच्याकडे पुणे महसूल विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार आहे. विभागातील पाचही जिल्ह्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत सर्व प्रशासकीय यंत्रणांचे समन्वय व नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ही वस्तूस्थिती विचारात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.