पुणे, ता. १७ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन महाविद्यालयात (स्वायत्त) फॅशन डिझायनिंग आणि इंटिरियर डिझायनिंगचे व्यावसायिक पदवी अभ्याक्रम (बी. व्होक) जून २०२२ पासून सुरू करणार असल्याची माहिती डीर्इएसचे उपाध्यक्ष महेश आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, बी. व्होकचे समन्वयक प्रशांत गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
आठवले म्हणाले, ‘बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन फॅशन आणि इंटिरियर या दोन क्षेत्रांतील सर्जनशील डिझायनर तयार करणे हा या अभ्यासक्रमांचा मुख्य उद्देश आहे. ऐश्वर्या डिझाईन स्टुडिओ, प्रतिभा रचकर बुटीक या फॅशन क्षेत्रातील रॉयल टच लॅमिनेट, रावत ब्रदर्स मॉड्युलर फर्निचर, ई-सेरॅमॉल इंडिया, स्पेस न स्टाईल या इंटिरियर क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांशी संलग्नता आणि सर्वच प्राध्यापक तज्ज्ञ आणि अनुभवी व्यावसायिक असल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करणे, भरपूर प्रात्यक्षिकांचा सराव आणि बाजारपेठेतील नवनवीन ट्रेंडची माहिती मिळणार आहे. अभ्यासक्रम यशस्वी करणार्या विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय किंवा नोकरी करता येईल किंवा कोणत्याही विद्यापीठात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेता येईल.’
प्राचार्य परदेशी म्हणाले, ‘तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता दिली आहे. या अभ्यासक्रमांसाठी डिजिटल वर्ग, संगणक कार्यशाळा आणि ग्रंथालयात पुस्तकांचे स्वतंत्र दालन निर्माण करण्यात आले आहे. यूजीसीच्या वैकल्पिक अभ्यासक्रम धोरणानुसार सहा महिन्यांनंतर प्रमाणपत्र, एक वर्षानंतर पदविका, दोन वर्षांनंतर प्रगत पदविका आणि तीन वर्षांनंतर पदवी प्रदान केली जाणार आहे. कोणत्याही शाखेची बारावीची परीक्षा किंवा १०+२ समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार आहेत. पहिल्या वर्षी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

