मुंबई-मराठीतील प्रसिद्ध गझलकार आणि ज्येष्ठ साहित्यिक इलाही जमादार यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले आहे. इलाही जमादार यांच्यावर सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 साली सांगतीलीत दुधगावात झाला. मराठी भाषेतील प्रसिद्ध गझलकार अशी इलाही जमादार यांची ओळख होती. दिग्गज गझलकार सुरेश भट यांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत असे. इलाही जमादार यांनी 1964 सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. मराठी, हिंदी, उर्दू दैनिक आणि मासिकांसाठी इलाही जमादार यांनी कविता व गझल लिहिल्या. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी म्हणून इलाही जमादार यांची विशेष ओळख होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
लोकप्रिय गझलकार इलाही जमादार यांच्या निधनाने मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. गझलरसिकांचा महानायक हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
इलाही जमादार यांनी मराठी गझलरसिकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य केलं. मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. इलाही जमादारांच्या गझला साहित्यरसिकांना यापुढेही कायम निर्भेळ आनंद देत राहतील. त्यांचं निधन ही गझलविश्वाची मोठी हानी आहे. मी इलाही जमादार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

