ते १६ जण म्हणजेच स्थायी समितीचे १६ सदस्य असून, त्यांच्याकडे चौकशी करणे बाकी -पोलीस
पुणे : होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे याने जामीन मिळण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे दिसून आले आहे. दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी लाडगेंचा जामीन अर्ज फेटाळत त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली .
लांडगे याने तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाला आज्जीचे (आईची आई ) निधन झाले असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याच्या वडिलांच्या मावशीचे निधन झाले आहे. त्याने खोटी माहिती देत न्यायालयाची दिशाभूल केल्याचे सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.आज्जीचे निधन झाल्याने तिच्या अंत्यविधीनंतरच्या कार्यक्रमास जायचे आहे, असे कारण सांगून लांडगे यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करीत २६ आॅगस्टपर्यंत जामीन देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात लांडगे यांच्या आज्जी नाही तर वडिलांच्या मावशीचे निधन झाले आहे, अशी माहिती ॲड. घोरपडे यांनी न्यायालयात दिली.लांडगे यांना जामीन मंजूर झाल्यास ते फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दबाव येण्याची दाट शक्यता आहे. तपासात उल्लेख झालेले ते १६ जण म्हणजेच स्थायी समितीचे १६ सदस्य असून, त्यांच्याकडे चौकशी करणे बाकी आहे. तसेच त्यांच्यात आणि अटक आरोपी यांचे रॅकेट आहे का? याबाबत तपास करणे बाकी आहे. त्यामुळे लांडगे यांचा जामीन फेटाळून लावण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. घोरपडे यांनी केला.शुक्रवारी जामीनावर सुनावणी :लांडगे, त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय ५६, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जांवर शुक्रवारीसुनावणी होणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त सीमा मेहेंदळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

