पुणे -झोपडपट्टी मधील महिलांना शिधापत्रिका व रेशन धान्य बाबत जाब विचारण्यास गेलेल्या माजी सभागृह नेते, अन्नधान्य वितरण समिती सदस्य,माजी नगरसेवक सुभाष जगताप यांचेवर अधिकाऱ्यांनी पोलिस तक्रार केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले.सुभाष जगताप यांच्यावरील खोटी कारवाई न थांबवल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा माजी गृहराज्यमंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी यावेळी दिला.तसेच मातंग समाजाच्या संघटनाचे शिष्टमंडळ लवकरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,शरद पवार व महविकास आघाडी च्या नेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले.यावेळी दोषी अधिकारी यांच्यावर चौकशी समिती नेमून कारवाई करावी,सुभाष जगताप यांच्यावरील खोटी कारवाई तत्काळ थांबवण्यात यावी,कामचुकार आणि दप्तर दिरंगाई करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करावी आदी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्यावरील दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध करून तीव्र निदर्शने करण्यात आली.या आंदोलनामध्ये माजी मंत्री रमेश बागवे,लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले, नगरसेवक अविनाश बागवे,निलेश वाघमारे सत्यशोधक बहुजन आघाडी चे संस्थापक सचिन बगाडे,रिपब्लिकन युवा मोर्चा चे नेते राहुल डंबाळे,लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हतागले,पुणे शहर मातंग समाज सचिव संजय केंदले,मातंग एकता आंदोलनाच्या महिला अध्यक्ष राजश्री ताई अडसूळ,गोविंद साठे यासह पुणे शहरातील विविध दलीत,मातंग समाजाच्या संघटनेचे नेते पदाधिकारी,महीला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे जिल्हा मातंग समाज संघटनेचे श्री संजय केंदळे म्हणाले की, “सुभाष जगताप हे गेल्या तीस वर्षांपासून सहकारनगर, पर्वती या परिसरामध्ये सामाजिक कार्यांमध्ये कार्यरत असून गोरगरीब, कष्टकरी ,वंचित, उपेक्षित समाजासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. या समाजातील कुटुंबांना वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उपोषण या माध्यमातून गेली तीस वर्ष श्री सुभाष जगताप यांनी आमच्या सर्व समाज बांधवांची सेवा केली आहे. असे असताना गेल्या काही दिवसांत पासून रेशनिंग संबंधित अनेक तक्रारी श्री. सुभाष जगताप यांच्याकडे येत होत्या. परिसरातील नागरिकांच्या रेशनिंगच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी श्री सुभाष जगताप यांनी वारंवार संबंधित विभागाच्या कार्यालयात पाठपुरावा केला. परंतु शेवटी या नागरिकांप्रमाणेच त्यांनादेखील अशाच प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देत अरेरावीची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांना श्री. सुभाष जगताप यांनी खडे बोल सुनावले, आमच्या न्याय व हक्कासाठी लढताना झालेल्या या घटनेत अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याऐवजी श्री. सुभाष जगताप यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.
गेल्या काही दिवसात श्री सुभाष जगताप यांनी सहकारनगर परिसर चालल्या चालणाऱ्या अवैध धंद्यांवर धाड आवाज उठवल्याने प्रशासकीय यंत्रणेचा त्यांच्यावर रोष होता, तो रोष या घटनेत गुन्हा नोंदवतांना दिसून आला व जामीन मिळणार नाही अश्या प्रकारची कलमे लावण्यात आली. तरीही न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याने त्यांना तात्काळ जामीन मंजूर झाला आहे.पुणे जिल्हा मातंग समाज या घटनेचा जाहीर निषेध करत असून येत्या काही दिवसात जर हे खोटे गुन्हे मागे घेण्यात आले नाही तर भविष्यात यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल “