मुंबई :
ओबीसी राजकीय आरक्षणाचा खून करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला होता. त्याचेच पातक म्हणून त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. भाजपा सत्तेत आल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा पेच सोडवेल अशी ग्वाही तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय असून सत्तेत येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं. ओबीसी राजकीय आरक्षण हे देवेंद्रजींच्या प्रयत्नांचे यश आहे अशी प्रतिक्रिया भाजपा मुंबई सचिव व राष्ट्रीय ओबीसी मोर्चा सदस्य प्रतिक कर्पे यांनी दिली.
श्री. कर्पे म्हणाले, ठाकरे सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यामुळे राज्यभरातील ओबीसी समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भाजपाने ओबीसी समाजाच्या व्यथा कायमच प्रभावीपणे मांडल्या. ओबीसी आरक्षण संपवण्याचा महाविकास आघाडीचा डाव भारतीय जनता पक्षाने हाणून पाडला. सत्तेत येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा संपूर्ण आढावा घेतला. तसेच ओबीसी आरक्षण लागू व्हावे यासाठी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. ओबीसींचं राजकीय आरक्षण लागू व्हावं यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील ते सर्व करा, असं श्री. फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले होते. भाजपचा डीएनए ओबीसी असून याच समाजाच्या जीवावर मोठा झालेला पक्ष आहे, असंही श्री. फडणवीस म्हणाले होते याची आठवण श्री. प्रतीक कर्पे यांनी करून दिली.

