पुणे : सक्षम पुणे महानगर संस्थेमार्फत २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२२ या दरम्यान नेत्रदान पंधरवडा’ आयोजिला आहे. याअंतर्गत नेत्रदान जनजागृती रॅली, नेत्रदान संकल्प अभियान, नेत्र तपासणी शिबीर, यांसारखे विविध उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणजे म.ए.सो. बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना या मराठी माध्यमाच्या शाळेत पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थी व पालकांसाठी नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी व म.ए.सो. नियामक मंडळाचे माजी उपाध्यक्ष संजय इनामदार उपस्थित होते. इनामदार यांनी आपल्या भाषणात बालमित्रांना संदेश देताना टी.व्ही, मोबाईलचा कमी वापर करणे व चॉकलेटचे प्रमाण अत्यल्प ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या टीमने विद्यार्थी व पालकांच्या डोळ्यांची तपासणी केली. नेत्र तपासणी केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या नेत्रविषयक समस्या जाणवल्या, त्यांचे पुढील उपचार डॉ. मनोहर डोळे फौंडेशन संचलित अथर्व नेत्रालय पुणे यांच्या वतीने मोफत करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजीव डोळे यांनी या उपक्रमाचा उद्देश नमूद केला.
या प्रसंगी सक्षम पुणे महानगरचे उपाध्यक्ष अशोक जव्हेरी, कोषाध्यक्ष सुहास मदनाल, शाळेचे महामात्र डॉ. अंकुर पटवर्धन, मुख्याध्यापिका सुनिता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘सक्षम’चे सचिव दत्तात्रय लखे यांनी केले. सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मंजुश्री गायकवाड यांनी केले.